भंडारा - सत्तेत कोणीही असो, सत्तेचा माज हा प्रत्येकाला येतो, असाच काहीसा प्रकार साकोली मतदारसंघात समोर आला आहे. 13 तारखेला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी पालकमंत्री डॉ. परिणय फुके एका सभेत लोकांना उघडपणे वाहतुकीचे नियम तोडण्यास सांगत आहेत. एका दुचाकीवर 5 लोक घेऊन या. कोणी थांबविल्यास सांगा फुकेची माणसं आहोत, तरी पोलीसवाला नसेल ऐकत तर मला फोन करा, तुम्हाला लगेच जाऊ देईल, असे सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा -तुमसर मतदारसंघात होणार तिहेरी लढत, प्रचाराची रणधुमाळी सुरू
या विषयी पालकमंत्र्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिल्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की, खोटा हे मात्र, समजू शकले नाही. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा साकोली विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके यांची वादग्रस्त चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होऊन चर्चेचा विषय बनत आहे.
पालकमंत्री डॉ. परिणय फुकेंचे वादग्रस्त वक्तव्य आज साकोली तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिणय फुके व इतर भाजप उमेद्वारांकरिता प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. तर या सभेची संपूर्ण जबाबदारी फुके यांच्यावर आहे. या संबंधाने कार्यकर्त्यांची बैठक घेत, भव्य दुचाकी रॅली काढण्याचा मानस आहे. तरी एका दुचाकीवर एक न येता पाच-पाच कार्यकर्ते या, असे आवाहन खुद्द पालकमंत्री या चित्रफितीमध्ये करताना दिसत आहेत.
हेही वाचा -'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले, आमचा लढा फडणविसांविरोधातच'
शिवाय पोलिसांनी पकडल्यास माझे किंवा या भागाचे विद्यमान आमदार राजेश काशीवार यांचे नाव सांगा, असे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे धडे शिकविणारे भाजप सरकार आता खुद्द असे बोल बोलत असेल तर हा सत्तेचा माज नाही तर काय आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे. जर पालकमंत्रीच असे वागत असतील तर इतर नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून नियमांचे पालन करण्याची अपेक्षा कशी करता येईल. या घटनेबाबत परिणय फुके यांनी बोलण्यास नकार दिला आहे.