भंडारा - जेवढे शक्य असेल तेवढं वसूल करा, असा अलिखित आदेश भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या शाखा व्यवस्थापकाला दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व शाखा व्यवस्थापकांनी सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत 31 मार्च या शेवटच्या दिवसापर्यंत शक्य तेवढ्या शेतकऱ्यांकडून कर्जवसुली केली. मात्र यासाठी संचारबंदीचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले. याविषयी जिल्हा व्यवस्थापकांना विचारले असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आणि कर्ज वसुली करू नका, असा काढलेला आदेश मागितल्यावर 1 एप्रिलला देतो, असे सांगितले.
रिझर्व्ह बँक व संचारबंदीच्या आदेशास भंडारा जिल्हा बँकेकडून केराची टोपली बँकेने मंजूर केलेल्या प्रचलित धोरणानुसार, सन 2019-20 हंगामातील खरीप पीक कर्ज परतफेडीची अंतिम तारीख 31-3-2020 होती. कोरोनामुळे संपूर्ण जगात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून देशातसुद्धा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 27 मार्चला रिझर्व्ह बँकेने एक आदेश काढला. यानुसार कर्ज परतफेडीची तारीख 31 मार्चवरून वाढवून 30 जून केली.
हा आदेश भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतही धडकला. मात्र, याकडे बँकेच्या अध्यक्षांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. जिल्ह्यातील सर्व शाखा व्यवस्थापकांना कर्ज वसुली सुरूच ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
कर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. हेच शेतकऱ्यांना सांगण्यात आले आणि म्हणून जिल्ह्यातील सर्वच शाखेवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. शेतकरी कुठे एकामागे एक चिटकून उभे होते तर कुठे समुहात उभे होते. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत होते. काही ठिकाणी गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.
याविषयी जिल्हा बँकेचे मुख्य प्रबंधकांना विचारले असता, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र तोंडी माहिती देत आम्ही मुदतवाढ केल्याचे पत्र पाठविले आहे. आता शेतकरीच ऐकत नाहीत, तर आम्ही काय करायचे, अशी माहिती दिली. मात्र आदेश कधी पाठविले, तो आदेश मिळेल का, असे विचारले असता 1 एप्रिल देतो म्हणून सांगितले.
भंडारा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पण असे असताना ही केवळ आपल्या स्वार्थासाठी जिल्हा बँकेने शेकडो लोक एकत्रित करून सरकारी आदेशाचा भंग केलाच त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचेही उल्लंघन केले. त्यामुळे या बँकेच्या अध्यक्षांवर आणि व्यवस्थापकांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.