महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा घागर मोर्चा - घागर

राधाकृष्ण विहार कॉलनीमध्ये नळाला पाणी येत नाही. बोअरवेल आटले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहेत. आमच्या परिसरात कमीत कमी २ टँकर पाणी दररोज द्यावे, अशा विनंतीचे पत्र मुख्याधिकारी यांना देण्यात आले, तर मुख्याधिकारी यांनी दररोज २ टँकर पाणी पाठवू असे लोकांना आश्वासन दिले.

भंडाऱ्यात पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा घागर मोर्चा

By

Published : Apr 26, 2019, 11:15 PM IST

भंडारा- शहरात पाण्याच्या समस्या वाढत आहेत. लोकांना पाणी मिळत नसल्याने राधाकृष्ण विहार कॉलनी भागातील लोकांनी भंडारा नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढत पालिकेच्या आत घागर फोडत निषेध व्यक्त केला. तर, सर्व उपाययोजना केल्याचा दावा मुख्याधिकरी करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अशा उडवाउडवीच्या उत्तरामुळे नगरसेवकही चांगलेच संतापले आहेत.

भंडाऱ्यात पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा घागर मोर्चा

दरवर्षी भंडारा नगरपरिषद परिसरातील खात रोडवरील वैशालीनगर, माधवनगर, केशवनगर राधाकृष्ण विहार, कृष्ण नगरी अशा बऱ्याच परिसरात पाण्याची समस्या निर्माण होते. त्यातच या वर्षी पाऊस हा सरासरी पेक्षा कमी पडल्याने पाणी समस्या ही एप्रिलपासूनच भेडसावू लागली आहे.

राधाकृष्ण विहार कॉलनीमध्ये नळाला पाणी येत नाही. बोअरवेल आटले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहेत. आमच्या परिसरात कमीत कमी २ टँकर पाणी दररोज द्यावे, अशा विनंतीचे पत्र मुख्याधिकारी यांना देण्यात आले, तर मुख्याधिकारी यांनी दररोज २ टँकर पाणी पाठवू असे लोकांना आश्वासन दिले. मात्र, त्याची पूर्तता होत आहे की नाही यावर त्यांनी लक्ष ठेवले नाही. जिथे दररोज २ टँकर मिळणार तिथे ४ दिवसानंतर १ टँकर पाणी आल्याने नागरिक संतापले आहेत. त्यानंतर त्यांनी भंडारा नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढत नगरपरिषदेच्या आत घागर फोडत प्रशासनाचा निषेध केले.

मागच्या वर्षी या भागातील नगरसेवकांनी स्वतःचे पैसे खर्च करून टँकर लावले. मात्र, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी त्यांच्या पैशांचे बिल अजूनही मंजूर न केल्याने या वर्षी नाईलाजास्तव टँकरने पाणी पुरवठा सुरू केला नाही.

पाण्याच्या समस्येविषयी मुख्याधिकारी यांनी सांगितले, की आमच्याकडे असलेल्या तिन्ही पंपाद्वारे लोकांना सुरळीत पाणी पुरवठा होत आहे. ज्या उंच भागावर पाणी जात नाही तिथे आम्ही रोज शक्य तेवढे पाणी टँकर पाठवून लोकांची गरज पूर्ण करीत आहोत. तसेच शहरात ३८५ बोअरवेल आहेत. यापैकी ४० ठिकाणी विद्युत पंप लावले असून तिथे उंचावर पाण्याची टाकी बांधून त्याद्वारे त्या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. तर ३४५ ठिकाणी हातपंप असून जवळपास सर्वच सुरू आहेत. १० ठिकाणी २ हजार लिटर क्षमतेचे आरो बसविले आहेत तर ३३ ठिकाणी ५ हजार क्षमतेचे आरो बसवले जाणार आहेत.

खरेतर मुख्याधिकारी यांना हे आकडे फक्त कागदावर माहिती आहेत. प्रत्यक्षात मुख्याधिकारी कधीही स्वतः खरी परिस्थिती जाणून घेण्याचे प्रयत्न करीत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. त्यांचा कागदावरील उपाययोजना या लोकांच्या पाणी समस्या सोडवू शकत नाहीत. जर या पाणी समस्येकडे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाही तर येणाऱ्या काळात पाणी समस्या ही गंभीर होणार हे मात्र नक्की आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details