भंडारा - रेती उत्खनन प्रकरणी जप्ती केलेल्या जेसीबीला सोडण्यासाठी २ लाखांची मागणी करणाऱ्या मोहाडी तहसील कार्यालयातील २ लिपिकांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. एकनाथ कातकडे आणि देविदास तुळशीराम धुळे, अशी या आरोपी लिपिकांची नावे आहेत.या २ आरोपींविरुद्ध मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आले आहे. या कार्यवाहीनंतर तहसील कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून वाळू माफिया आणि महसूल विभागात यांच्यातील व्यवहार चव्हाट्यावर आले आहेत.
मोहाडी तालुक्यांतर्गत येणाऱ्या बेटाळा येथील तक्रारदार सरपंच ईश्वरकर यांच्या मालकीचे जेसीबी मशीन रेती घाटावर किरायाने रेती उपसा करण्याकरता दिली होती. मात्र, २ मार्चला मध्यरात्री रेती उपसा करत असल्याने मोहाडी तहसील कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक कातकडे यांनी या जेसीबीवर कारवाई करत त्याला जप्त केले. त्यानंतर जेसीबी सोडवण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच त्यांनी ही रक्कम न दिल्यास अवैधरित्या रेतीचा उपसा करत असल्याच्या कारणावरून तक्रारदाराला ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड लावण्याची धमकी दिली. यानंतर कारवाईतून वाचण्यासाठी तडजोडीअंती २ लाखांची रक्कम देण्याचे ठरले. मात्र, ईश्वरकर यांनी याची माहिती भंडारा लाचलुचपत विभागाला दिली. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून कातकडे आणि धुळे यांना २ लाखांची लाच घेताना सोमवारी सायंकाळी रंगेहात पकडले.
लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱयांनी २ लिपीकला पकडले असले तरी यामध्ये नायब तहसीलदार हा मुख्य सूत्रधार आहे. मात्र, तो स्वतः पुढे येत नाही, असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला ही कार्यवाही केवळ आकसापोटी केली आहे. या कार्यालयात असे प्रकार होत नाही. तसेच या उलट तक्रारकर्त्याने कार्यवाहीवेळी आमच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळेच आमच्या विरोधात या आरोपीने तक्रार नोंदवली आहे, अशी माहिती लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेल्या २ लिपिकांनी दिली.