महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरफोडीचा आरोपी असलेला कोरोनाबाधित रुग्ण आयसोलेशन वार्डातून फरार, पोलिसांची वाढली डोकेदुखी - आयसोलाशन वार्डातून कोरोनाबाधित आरोपी फरार

घरफोडीच्या प्रकरणातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला कोविड आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, सदर आरोपी हा दिवसाढवळ्या पोलिसांना चकमा देत तिथून फरार झाला. या प्रकारामुळे महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांच्या 2 पथकांद्वारे या कोरोनाबाधित आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांची वाढली डोकेदुखी
पोलिसांची वाढली डोकेदुखी

By

Published : Sep 10, 2020, 5:00 PM IST

भंडारा :कोरोना पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असली तरी आरोपी याचा फायदा घेताना दिसत आहेत. जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथील कोरोना सेंटरमधून घरफोडीच्या गुन्ह्यातील कोरोनाबाधित असलेला आरोपी फरार झाल्याची घटना येथे घडली आहे. राजेश गायकवाड असे फरार कोरोनाबाधित आरोपीचे नाव आहे. साकोली पोलिसांच्या दोन पथकाद्वारे त्याचा शोध सुरू आहे.

मागील अनेक दिवसांपासून साकोली तालुक्यात व जिल्ह्याच्या इतर ठिकाणी घरफोडीच्या तक्रारी वाढत चालल्या होत्या. तर, भंडारा पोलीस घरफोडीच्या आरोपीच्या मागावर होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपी राजेशला नवेगावबांध वरुन अटक केली. नियमाप्रमाणे त्याची कोरोना तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोपीला उपचारासाठी सेंदुरवाफा येथील शासकीय तंत्रनिकेतन मुलींचे वसतीगृह येथे तयार केलेल्या कोविड आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले. प्रत्येक आयसोलेशन वार्डच्या सुरक्षेसाठी पोलीस नियुक्त केले जातात. त्याप्रमाणे या ठिकाणीसुद्धा पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र, पोलीस सुरक्षा असतांनाही आरोपीने पोलिसांची नजर चुकवत आयसोलेशन वार्डमधून दिवसाढवळ्या धूम ठोकली. या प्रकारामुळे महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांच्या 2 पथकांद्वारे या कोरोनाबाधित आरोपीचा शोध सुरू आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो जिथे जिथे लपायला जाईल तिथे तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. तसेच तो आरोपी असल्याने त्याने पुन्हा अपराध केल्यास नागरिक अडचणीत येतील. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर या कोरोनाबाधित आरोपीला पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. ह्या घटनेमुळे कोविड आयसोलेशन वार्डच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच आठ दिवसांआधी दोन आरोपींना अटक केल्यावर ते पॉझिटिव्ह निघाले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे 14 कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना आधी कोरोनाशी लढा द्यावा लागत आहे. तर, कोरोनामुळे पोलिसांमध्येही भीतीचे वातावरण असले तरी आरोपी याच गोष्टीचा फायदा घेताना दिसत आहे.

हेही वाचा -भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरली, मात्र पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

ABOUT THE AUTHOR

...view details