भंडारा -गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणाचे 33 ही गेट उघडण्यात आले आहे. 30 गेट हे अर्ध्या मीटरने तर 3 गेट 1 मीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून सध्या 3929.127 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळपासून टप्याटप्याने गेट उघडण्यास सुरुवात झाली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत 33 ही गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात येणार होते. मात्र धरणात वाढणाऱ्या पाण्यामुळे दुपारी 1 वाजाता 33 गेट उघडण्यात आले आहेत. या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्राजवळील गावांतील सर्व नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. तर आज 23 जुलै रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सकाळपासून टप्प्याटप्प्याने उघडण्यात आले गेट
गोसे धरणाची सध्याची पाणी पातळी 243.17 मीटर एवढी आहे. पाणीसाठा 41.80% आहे. ही पाणीपातळी कायम ठेवण्यासाठी 23 जुलै रोजी सकाळपासूनच टप्याटप्याने गेट उघडण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळी 10 वाजेपर्यंत 19 गेट उघडण्यात आले होते. तर दुपारी साडेबारा वाजता 31 गेट उघडण्यात आले. यामधून 3390.5 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र धरणात वाढत असलेले पाणी बघताच केवळ 15 मिनिटातच धरणाचे 33 ही दारे उघडण्यात आली. या 33 पैकी 30 दारे ही अर्धा मीटरने तर 3 गेट 1 मीटरने उघडण्यात आले असून यामधून 3929. 127 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच विद्युत गृहातून 160 आणि उजव्या कालव्यातून 24 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असून एकूण 4113.127 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी पात्राच्या जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.