महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नासाठी वडिलांकडून होईना पैशाची जुळवाजुळव; तरुणीने जाळून घेत संपवले जीवन

वडिलांनी लग्न जमवले. तारीख देखील ठरवली. २१ एप्रिल रोजी लग्न ठरले. मात्र, लग्नासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव होत नव्हती. याची मोठी काळजी वडिलांच्या चेहऱ्यावर ती रोज पाहायची, या असह्य वेदना सहन न करू शकल्याने एका २२ वर्षीय तरुणीने हळद लागण्यापूर्वीच बाथरूममध्ये जाळून घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना बीड शहरातील संत नामदेवनगर भागात शनिवारी दुपारी घडली. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

बीड

By

Published : Apr 6, 2019, 8:41 PM IST

बीड- वडिलांनी लग्न जमवले. तारीखदेखील ठरवली. २१ एप्रिल रोजी लग्न ठरले. मात्र, लग्नासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव होत नव्हती. याची मोठी काळजी वडिलांच्या चेहऱ्यावर ती रोज पाहायची, या असह्य वेदना सहन न करू शकल्याने एका २२ वर्षीय तरुणीने हळद लागण्यापूर्वीच बाथरूममध्ये जाळून घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना बीड शहरातील संत नामदेवनगर भागात शनिवारी दुपारी घडली. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

प्रतीक्षा गौतम जाधव (वय २२ रा. संत नामदेवनगर, बीड) असे जाळून घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. डी. एड. पदवी संपादन केलेल्या प्रतीक्षाच्या घरची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. गरीब परिस्थितीमुळे ती एका इंग्रजी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. तिला दोन बहिणी असून एक भाऊ आहे. तिचे वडील मिस्त्री काम करतात तर आई गृहिणी आहे.

प्रतीक्षाची एक बहीण खासगी दुकानात काम करते. शनिवारी दुपारी तिचा भाऊ बहिणीचा जेवणाचा डबा घेऊन गेला. यावेळी प्रतीक्षा घरात एकटीच होती. घरात कोणी नसल्याचे पाहून तिने बाथरूम आतून बंद केले व अंगावर रॉकेल ओतून घेऊन जाळून घेतले. शरिराला आगीचे चटके बसायला लागल्यानंतर तीने आरडाओरडही केली. यावेळी आरडाओरड ऐकून शेजारी धावून गेले, तोपर्यंत भाऊही तेथे आला. शेजाऱ्यांनी व भावाने दरवाजा तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत प्रतीक्षा ९५ टक्केपेक्षाही अधिक भाजली होती. संबंधित घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुरभे तातडीने घटनास्थळी पोहोचले रुग्णवाहिकेतून प्रतीक्षा जाधव हिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचार घेत असतानाच प्रतीक्षाचा मृत्यू झाला.

कुटुंबात असलेले अठराविश्व दारिद्र्य यामुळेच प्रतिक्षाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आमचा संशय आहे, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे शिवलाल पुरभे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details