बीड- चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करून अर्धा भाग फ्रिजमध्ये, तर अर्धा जाळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 9 दिवसांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी 4 तासात लावला आहे.
हेही वाचा - मराठा समाजासाठी काम करणाऱ्या 'सारथी' संस्थेला जाणीवपूर्वक स्थगिती - विनायक मेटे
संजय साळवे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रेश्मा संजय साळवे (30, रा. अशोकनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. रेश्माचा संजय साळवेसोबत 13 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. लग्नानंतर संजयने पत्नीचा धर्म स्वीकारुन संजय उर्फ अब्दुल रहेमान हे नाव धारण केले होते. त्यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी 2 अपत्ये आहेत. संजय हा काही कामधंदा करत नसल्यामुळे रेश्मा व संजयमध्ये खटके उडत होते. रेश्मा बचत गटाचे तसेच महिलांची शासकीय कार्यालयातील कामे करत असे. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय हा पत्नी रेश्माच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दरम्यान, 26 नोव्हेंबरला संजयने रेश्माचा मोबाईल गहाण ठेवला. त्यावरुन रेश्मा व संजयचे कडाक्याचे भांडण झाले. यावरून पत्नीला कायमची अद्दल घडवण्यासाठी संजयने 30 नोव्हेंबरला खूनाचा कट रचला. त्या रात्री जेवण करुन सगळे झोपी गेल्यानंतर संजयने पत्नीच्या डोक्यात घाव घातला. त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला.
हेही वाचा - परळीत महाविकास आघाडीचा राज्यातील पहिला विजय; धनंजय मुंडें गटाने सिरसाळा ग्रा. प. निवडणूकीत मारली बाजी
प्रेत जाळण्याचा फसला प्रयत्न-
दोन्ही मुले झोपेतून जागे होण्याआधी पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संजयने घरातील पाण्याच्या रिकाम्या टाकीत मृतदेह टाकला. पेट्रोल ओतून हे मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह जळाला नाही. त्यामुळे त्याने मृतदेह पुन्हा टाकीबाहेर काढला आणि त्याचे तुकडे केले. तुकडे केलेले शरीराचे अवयव त्याने घरातील फ्रीजमध्ये ठेवून तो लॉक केला.