बीड- खरिपाच्या पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. परंतु बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या लॉकडाऊनमुळे आडत दुकाने बंद असल्याने कृषिमाल विकायचा कुठे असा प्रश्न बीड जिल्ह्यातील परळी येथील शेतकरी रवी गित्ते यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ आडत दुकाने सुरू करावेत, म्हणजे आम्हाला गहू, ज्वारी, हरभरा विकून बी-बियाणे, खत खरेदी करता येईल असे देखील शेतकरी म्हणाले.
'रब्बीचा शेतीमाल विकायचा कुठे?'
1 मे पासून बीड जिल्ह्यात कडक लॉकडाउन सुरु आहे. यादरम्यान शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीची लगबग सुरू असते. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. बीड, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव, आष्टी आदी ठिकाणी सध्या आडत दुकानांना टाळे असल्याने रब्बीचा शेतीमाल विकायचा कुठे? तसेच गहु, ज्वारी, हरभरा विकला नाही, तर खरिपाच्या पेरणीसाठी पैसे येणार कसे? हा प्रश्न बीड जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सध्या बीड जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक शेतकरी ग्रामीण भागातून बी-बियाणे व खत खरेदीसाठी शहरात येतात. परंतु बीड पोलीस शेतकऱ्यांना अडवत असल्याने बी-बियाणे व खतांची दुकाने सुरु असतांनाही खतांची खरेदी करणे अवघड झाले असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाले आहे.