महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पश्चिम महाराष्ट्रात पूर, बीड जिल्ह्यात मात्र पाणी टंचाई कायम

एकीकडे मुंबई, पुणे व कोल्हापूरमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात टंचाई कायम आहे.

By

Published : Aug 8, 2019, 7:48 PM IST

Updated : Aug 8, 2019, 11:49 PM IST

कोरडे सिंचन

बीड- एकीकडे मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात टंचाई कायम आहे. गुरुवारपर्यंत बीड जिल्ह्यात सरासरी ४६.६६ मि.मी. पावसाची नोंद असून, जिल्ह्यात एकूण १४४ लघु व मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी १०३ प्रकल्प कोरडेठाक आहेत.

यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या साप्ताहिक पाणीसाठा अहवालानुसार बीड जिल्ह्यात केवळ ०.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळ्याचे दोन महिने सरले तरी पाण्याची टंचाई बीड जिल्ह्यात कायम आहे.

अशी आहे बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची सद्यस्थिती

बीड जिल्ह्यात एकूण ११ तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये एकूण लघु आणि मध्यम असे एकूण १४४ सिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये माजलगाव बॅक वॉटर व केज तालुक्यातील मांजरा धरण हे दोन मोठे प्रकल्प आहेत. या दोन्ही मोठ्या प्रकल्पांमध्ये मृतसाठा आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील एकूण सिंचन प्रकल्पांपैकी १०३ प्रकल्प पावसाळ्याचे अर्धाऋतू संपूनही कोरडे पडलेले आहेत. जोत्याखाली पाणी असलेल्या प्रकल्पांची संख्या केवळ 32 आहे. 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची संख्या ८ आहे. याशिवाय २५ ते ५० टक्के पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांमध्ये केवळ अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी धरणाचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूर, बीड जिल्ह्यात मात्र पाणी टंचाई कायम

ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने बीड जिल्ह्यातील नागरिक चिंताक्रांत आहेत. एकीकडे राज्यात बहुतांश भागात अतिवृष्टी झाली आहे. तर मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यावर पाऊस रुसला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या घोषवाऱ्यानुसार बीड जिल्ह्यात सध्या केवळ ०.४५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जून-जुलै हे दोन महिने पावसाळ्याचे संपले आहेत. आता ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात म्हणजे परतीच्या पावसाकडे बीड जिल्ह्यातील बळीराजा डोळे लावून बसला आहे. बीड जिल्ह्यातील काही भागात तर सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र ,पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Last Updated : Aug 8, 2019, 11:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details