बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ग्रामस्थांनी आज (शनिवारी) कुलूप ठोकले. इयत्ता नववी व दहावी या वर्गाच्या विज्ञान आणि गणित या विषयासाठी मागील चार-पाच वर्षांपासून पात्रताधारक शिक्षक नियुक्त नाहीत. यामुळे विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले आहे.
विशेष म्हणजे चकलंबा येथील ही शाळा बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा आहे. या शाळेची पटसंख्या ९७० असून यात विद्यार्थ्यांची संख्या ४६६ तर विद्यार्थिनींची संख्या ५०४ आहे. विद्यार्थ्यांचे प्राथमिक वर्गांसाठी आणखी प्रवेश चालू आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे या शाळेकडे कायम दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत या शाळेला कुठल्याच भौतिक सुविधा मिळालेल्या नाहीत. मागील २ वर्षांपासून ग्रामस्थांनी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षणाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अनेकदा निवेदने दिलेली आहेत. असे असतानाही चकलांबा येथील शाळेला शिक्षक मिळालेले नाहीत जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमच्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.