बीड- एकीकडे पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू करून माणुसकीचे दर्शन घडत असताना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. अनाथ मातेचा एड्सग्रस्त बारा वर्षाचा मुलगा आज पहाटे मृत्युमुखी पडला. एड्सने मृत्यू झाल्याने अंत्यविधीला कोणीच यायला तयार नव्हते. अखेर आईने त्या बारा वर्षाच्या एचआयव्ही बाधित मुलाला उचलले व बीड तालुक्यातील इन्फंट इंडिया येथे आणले. एचआयव्ही बाधीत मुलांसाठी काम करणारे दत्ता व संध्या बारगजे यांनी त्या बारा वर्षाच्या एचआयव्ही बाधीत मुलाचा अंत्यसंस्कार केला.
'त्या' एचआयव्ही बाधीत मुलाच्या अंत्यविधीसाठी इन्फंट इंडियाने घेतला पुढाकार - beed AIDS
माणुसकीला काळिमा लावणारी धक्कादायक घटना बीडमध्येसोमवारी घडली. एचआयव्ही बाधीत असल्यामुळे मुलाच्या अंतविधीकडे गावकऱ्यांनी पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला.
एचआयव्हीग्रस्त अनाथ मातेला दोन आपत्य होती. सहा वर्षापूर्वी एचआयव्हीनेच मोठ्या मुलीचा मृत्यू झाला. आज वयाच्या बाराव्या वर्षी मुलाचा जीव गेला. एड्सने मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मुलाच्या मृतदेहाला मुंगळे लागले. मात्र, अंत्यविधीला कोणी येत नव्हते. अखेर या मुलाला कपड्यामध्ये गुंडाळून असह्य झालेल्या मातेने 50 कि.मी.चे अंतर कापून इन्फंट संस्थेकडे धाव घेतली.
‘दादा माझ्या पोटच्या गोळ्याने जीव सोडला. एड्सच्या भितीने घराकडे कोणी फिरकेना. तुम्ही मला आधार द्या, आसरा द्या, माझ्या बाळाचे अंत्यसंस्कार करा’, असे म्हणत या मातेने हंबरडा फोडला. शेवटी इन्फंट इंडिया या संस्थेमध्ये एचआयव्हीग्रस्त चिमुकल्यांनासोबत घेऊन स्मशानस्थळी चिमुकल्यावर अंत्यसंस्कार केले आले.