बीड - जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीसाठी सोमवारी मुलाखती घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अल्प प्रतिसादानंतर पुन्हा एकदा वंचितने विधानसभा निवडणुकीची जोरदार रणनीती आखण्यासाठी सुरुवात केल्याचे दिसत आहे.
ज्या वंचित समाजाला न्याय मिळाला नाही, त्याच समाजातील व्यक्तीला उमेदवारी - अण्णाराव पाटील ज्या वंचित समाजाला न्याय मिळाला नाही, त्याच समाजातील व्यक्तीला उमेदवारी - अण्णाराव पाटील
बीड जिल्ह्यातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघातून काही नेत्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. यामध्ये केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राहिलेले पृथ्वीराज साठे व संजय गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीमार्फत केजमधून उमेदवारी मागितली आहे. गेवराईमधून विष्णू देवकते, माजलगावमधून शेतकरी नेते गंगाभिषण थावरे, रविकांत राठोड परळीमधून राजेसाहेब देशमुख व संजय दौंड तर बीडमधून शेख बक्षु यांची नावे उमेदवारीसाठी समोर येत आहेत. आष्टी विधानसभा मतदार संघातून मात्र अद्याप पर्यंत कोणाचे नाव समोर आलेले नाही. मागील 70 वर्षात ज्या वंचित समाजाला न्याय मिळाला नाही, त्या समाजातील व्यक्तीला वंचित बहुजन आघाडी संधी देणार असल्याचे समितीतील सदस्य अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वंचितच्या मुलाखतींकडे बीड जिल्ह्यातील प्रमुख व दिग्गज नेत्यांचे बारीक लक्ष आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या विशेष समितीकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे. या समितीमध्ये अण्णाराव पाटील, अशोक सोनवणे, प्रा. किशोर चव्हाण, रेखा ठाकूर यांचा समावेश आहे. मुलाखतीत पात्र ठरलेल्या व्यक्तीलाच आम्ही उमेदवारी देणार आहोत अशी माहिती समिती सदस्य अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.