बीड- प्रशासनाकडे रेशन कार्डची मागणी करत अनेक महिने हेलपाटे मारूनही कार्ड मिळाले नाही. त्यासाठी लग्न व कुटुंब आवश्यक आहे, असा शेरा मारत एका तरुणाचा रेशन कार्ड मागणीचा अर्ज प्रशासनाने फेटाळून लावला. त्यानंतर त्या तरुणाने चक्क घोड्यावर बसून आपली वरातच वाजत-गाजत पाटोदा येथील तहसील कार्यालयात आणली. या अनोख्या आंदोलनामुळे तहसील प्रशासनाचा पुरता गोंधळ उडाला. अमित घनशाम आगे असे त्या तरुणाचे नाव आहे.
एक तर मला रेशन कार्ड द्या, अन्यथा माझं लग्न लावून द्या, असे म्हणत तरुणाने तहसील कार्यालयात बँड-बाजासह वरात आणली. हा प्रकार पाहून पाटोदाचे तहसील प्रशासनही वठणीवर आले आणि अखेर त्याच ठिकाणी त्या युवकाच्या हातात प्रशासनाने रेशन कार्ड सुपूर्द केले. या अनोख्या आंदोलनाची बीड जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे.
रुणाची तहसील कार्यालयावर वाजतगाजत वरात प्रशासन त्रुटी काढत होते-
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील अमित घनशाम आगे हा युवक उच्चशिक्षित असून त्याने विज्ञान शाखेची पदवी घेतलेली आहे. उच्चशिक्षण घेऊनही नोकरी नसल्याने अमित गावाकडेच राहतो. अमितला रेशन कार्ड आवश्यक असल्याने पाटोदा तहसील कार्यालयाकडे त्याने रेशन कार्ड साठी 29 सप्टेंबर 2020 रोजी अर्ज केला होता. पाटोदा तहसील प्रशासनाने अमित यांच्या रेशन कार्ड मागणी अर्जामध्ये अनेक त्रुटी काढल्या, त्या सर्व त्रुटी अमित यांनी वेळोवेळी पूर्ण केल्या. तरीदेखील तहसील प्रशासन त्यांना रेशन कार्ड द्यायला तयार नव्हते. अमित यांनी सातत्याने मागणी लावून धरल्यानंतर प्रशासनाने अमित यांचा अर्ज निकाली काढायचा म्हणून, स्वतंत्र रेशन कार्डसाठी लग्न झालेले असणे आवश्यक आहे, असा शेरा मारला.
लग्न तर लावा नाही तर... रेशन कार्ड द्या-
रेशन कार्ड मागणी अर्ज नामंजूर झाल्याने या तरुणाने मुजोर प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी भन्नाट युक्ती लढवली आणि चक्क नवरदेवाचे कपडे व सजवलेल्या घोड्यावर बसून मित्रमंडळी गोळा करून बँड बाजा लावून स्वतःची वरात तहसील कार्यालयात वाजत-गाजत आणली. कधी नव्हे ते तहसील कार्यालयात घोड्यावर बसून नवरदेव आल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. एकतर मला रेशन कार्ड द्या अन्यथा माझे लग्न लावून द्या, अशी भूमिका अमित यांनी घेतली घेतल्याने प्रशासनाचा पुरता गोंधळ उडाला अखेर पाठवण्याच्या तहसील प्रशासनाने एक तासाच्या आत अमित यांचे रेशन कार्ड तयार केले व त्यांच्या हातात दिले त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची बीड जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अरुण जाधव , पंचायत समिती सदस्य यशवंत खंडागळे, गोरख झेंड , सचिन मेघडंबर , विठ्ठल नाईकवाडे , रमेश वरभुवन , सुनील जावळे , विठ्ठल पवळ , अतुल आगे यांच्या सह अनेकजण सहभागी झाले होते.
सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे मला मुलगी कोण देणार-
प्रशासनाकडून या युवकाला लेखी पत्र देण्यात आले व यामध्ये एक व्यक्ती ही कुटुंबाच्या व्याख्येमध्ये बसत नसल्याने एका व्यक्तीच्या नावे शिधापत्रिका देण्याची तरतूद नसल्याचे सांगत त्याचा अर्ज निकाली काढला होता. मात्र अमितच्या म्हणण्या नुसार तो आईवडिलांपासून विभक्त असून उच्चशिक्षण घेतले आहे. मात्र, नोकरी मिळत नाही आणि नौकरी नसेल तर लग्नासाठी मुलगीही कोण देणार? असे सांगत रेशन कार्डची सातत्याने मागणी सुरू ठेवली होती. मात्र प्रशासनाकडून दखल न घेतली गेल्याने त्यानेही अनोखी शक्कल लढवली असल्याचे अमित यांनी सांगितले.