बीड - गेवराई तालुक्यातील खांडवी (अंबूनाईक तांडा) येथील शेतकरी बैलगाडीत पाणी आणण्यासाठी आपल्या शेतात जात होते. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी आणि २ मुले होते. यातील एक अडीच वर्षाची मुलगी गाडीतून खाली पडल्याने तिच्या अंगावरून चाक गेले. त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रागिनी आडे असे या मृत मुलीचे नाव आहे.
बीडमध्ये पाणी बळी; बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने अडीच वर्षाची मुलगी ठार - मृत्यू
पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे गेवराई तालुक्यातील शेतकरी बैलगाडीत पाणी आणण्यासाठी आपल्या शेतात जात होता. यावेळी बैलगाडीतील त्याची अडीच वर्षाची मुलगी खाली पडल्याने तिच्या अंगावरून चाक गेले. त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गेवराई तालुक्यातील खांडवी येथील (अंबूनाईक तांड्यावर) पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, २ दिवसापासून गेवराई शहराला पाणी पुरवठा करत असलेल्या गोदावरीच्या बंधाऱ्यातील पाणी संपल्यामुळे बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पापासाहेब आडे हे बैलगाडीने पाणी आणण्यासाठी गावापासून दीड कि.मी. अंतरावर असलेल्या आपल्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी जात होते. बैलगाडीत त्यांची पत्नी आणि २ मुले होते. यावेळी अडीच वर्षाची मुलगी गाडीतून खाली पडल्याने तिच्या अंगावरून चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली.
दरम्यान, ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी तातडीने रागिनीला गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने अंबूनाईक तांडा येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी सायंकाळी रागिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.