बीड- गेवराई तालुक्यातील गडी- माजलगाव महामार्गावर व्यायामासाठी आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता तळेवाडी शिवारात घडली. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
गेवराईत व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडले; तिघांचाही मृत्यू - GEVRAI
सुनील प्रकाश थोटे (वय 15), तुकाराम विठ्ठल यनगर (वय 17), अभिषेक भगवान जाधव (वय 16, सर्व राहणार तळेवाडी तालुका गेवराई), अशी मृत तरुणांची नावे आहेत.
शनिवारी पहाटे गडी-माजलगाव महामार्गावर तळेवाडी शिवारात तिघेही तरुण व्यायाम करण्यासाठी गेले होते. यादरम्यान अज्ञात वाहनाने या तरुणांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुनील थोटे व अभिषेक जाधव हे दहावीच्या वर्गात आहेत. सुनील प्रकाश थोटे याला गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला, तर तुकाराम विठ्ठल यनगर याला उपचारासाठी बीडला नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
गडी ते माजलगाव या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. कुठल्या वाहनाने त्या तरुणांना चिरडले आहे याचा शोध गेवराई पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.