बीड :राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये विविध ठिकाणी मेळावे, बैठक त्याचबरोबर महाप्रबोधन यात्रा देखील होत असल्याचे आपण पाहत आहोत. येत्या 20 तारखेला बीडमध्ये होत असणाऱ्या महाप्रबोधन यात्रेपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात राडा झाला आहे. जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात हाणामारीपर्यंतचा वाद झाल्याचे समोर आले आहे. मात्र त्यानंतर आता एक धक्कादायक अन खळबळजनक माहिती समोर आली आहे.
गणेश वरेकर सोबत बाचाबाची :शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझे पद देखील त्या विकायला निघाल्या आहेत. आम्ही इथे जिल्हाप्रमुख आहोत. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन पद द्या, असे मी त्यांना सांगत होतो. त्यावेळी गणेश वरेकर आणि माझ्यात बाचाबाची झाली. यात मी सुषमा अंधारे यांना देखील एक कानाखाली ठेवून दिली’ अशी स्पष्ट माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी व्हिडिओ करून दिली आहे.
स्कॉर्पिओ गाडी फोडली : मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे मी स्वाभीमानानेच पक्षासाठी काम करणार. मला अशा प्रकारचा अन्याय सहन होत नाही. त्यांचा सगळा प्रकार अति झालेला असल्यानेच नाईलाज झाल्याचे अप्पासाहेब जाधव म्हणाले आहेत. या प्रकारानंतर अप्पासाहेब जाधव आणि गणेश वरेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यात वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची स्कॉर्पिओ गाडी फोडली असल्याची माहिती मिळत आहे.