बीड- गेल्या बारा दिवसांपासून सर्वत्र लॉकडाऊन आहे. कोरोना विषाणुशी लढा ही आमची प्राथमिकता आहे. याबाबत दुमत नाही. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये हातावर पोट असलेला ऊसतोड कामगार घाबरलेला आहे. त्या गोरगरिबांवर कोरोनाचे संकट तर आहेच.
बीडमध्ये ऊसकामगारांवर उपासमारीची वेळ कोरोनामुळे मरू तेव्हा मरू, मात्र आता उपासमारीमुळे आम्हाला मरावे लागत आहे, असे या ऊसतोड कामगारांचे म्हणणे आहे. हे वास्तव बीड जिल्ह्यात व इतरत्र समोर येतेय. याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला कामगारांच्या सद्यस्थितीचा हा आढावा.
कोरोना विषाणुशी लढण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी घरात बसून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यादरम्यान, मात्र, ज्यांचे हातावर पोट आहे, असे मजूर उपासमारीला सामोरे जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. देशाच्या किंबहुना जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक हातभार असलेल्या या ऊसतोड कामगारांपुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यामध्ये बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांसोबतच बांधकाम कामगार यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या हातावर पोट असलेल्या मजुरांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी प्रभावी, अशी कुठली यंत्रणा अद्यापपर्यंत तरी सुरू झालेली नाही. या सगळ्या उपक्रमांमध्ये सामाजिक संस्थांची मोठ्या प्रमाणात मदत प्रशासनाने घेणे अपेक्षित आहे. जर या ऊसतोड मजूर, बांधकाम कामगार यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचल्या नाही तर त्यांची उपासमार ही अटळ आहे. जिल्हा प्रशासन यासाठी काय पाऊल उचलते, ते पाहावे लागणार आहे.