महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूजा चव्हाण प्रकरण : बदनामी थांबवा अन्यथा आत्महत्या करू, कुटुंबीयांचा इशारा - बदनामी थांबवावी लहू चव्हाण

परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. पूजाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या मृत्यूपेक्षा बदनामी जास्त केली जात असल्याने ती थांबवा अन्यथा आम्ही आत्महत्या करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

पूजा चव्हाण
पूजा चव्हाण

By

Published : Feb 27, 2021, 7:47 AM IST

बीड (परळी वैजनाथ) - बंजारा समाजाची युवती पूजा चव्हाण हीने पुण्यात आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडीलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'माझा कोणावरही संशय नाही. सोशल मीडियावरील आमची बदनामी थांबवावी. या प्रकरणावरुन नेत्यांनी राजकारण करू नये. मुख्यमंत्री, पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देऊन तपासाबाबत चर्चा करा. मात्र, उघडपणे कोणाशीही नाव जोडून आमची बदनामी थांबवा, अशी विनंती पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी केली आहे.

मुलीच्या मृत्यूपेक्षा आमची बदनामीच जास्त -

पूजा चव्हाणचे कुटुंबीय


परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येसाठी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. सध्या पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याने शिवसेनेने वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यातच भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ या आक्रमक झाल्या असून त्यांनी संजय राठोड यांच्या अटकेची मागणी केली आहे. या प्रकरणात आता पूजाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या मृत्यूपेक्षा बदनामी जास्त केली जात असल्याने ती थांबवा अन्यथा आम्ही आत्महत्या करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

बदनामी थांबवली नाही तर आत्महत्या करणार -

पूजाची आई मंडूबाई चव्हाण यांनी माझ्या मुलीची बदनामी थांबवा, नाहीतर आम्ही सर्वजण आत्महत्या करणार असे अश्रू ढाळत सांगितले. तिच्या मृत्यूपेक्षा बदनामी जास्त केली जात आहे. माझ्या पोटचा गोळा गेला, त्या दुःखात असून ही नाहक बदनामी केली जात आहे. त्यांना पोरी नाहीत का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच चौकशी देखील याप्रकरणी केली पाहिजे, अरुण राठोड कोण त्याला आम्ही ओळखत नाही, विलास चव्हाण याला पाचही मुली राखी बांधायच्या. तो मानलेला भाऊ होता, असे त्या म्हणाल्या.

माझी बहीण आत्महत्या करू शकत नाही -

पूजाची दहावीत शिकणारी बहीण म्हणाली, माझी बहीण वाघीण होती. ती आत्महत्या करू शकत नाही. तिचे फोटो पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्यासोबत देखील आहेत, ते व्हायरल का होत नाहीत. ते पुरुषासोबत नाहीत म्हणून का? एका मुलीचे ठराविक लोकांसोबतचे फोटो व्हायरल कसे केले जातात? त्यांना हा अधिकार कोणी दिला. असा सवाल पुजाच्या बहिणीने उठवला आहे.

राजकारण का केलं जातयं ? केला सवाल

अद्यापही पुजाच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पुजाचे वडील लहू चव्हाण यांनी समाज माध्यमांजवळ मन मोकळे करताना सांगितले, की पूजाच्या आत्महत्या प्रकरणात काय झाले माहिती नाही. कोणीही येते, नातलग म्हणून सांगून काहीही बोलतात. तुम्ही शहानिशा न करता कसे दाखवता. माझे नातलग माझ्यासोबत आहेत. माझ्या दुःखात सहभागी आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. मग राजकारण का केलं जातंय?, कोण आहे चित्रा असे पुढे लहू चव्हाण म्हणाले. संतप्त होऊन लहू चव्हाण यांनी सांगितले, उद्यापासून बदनामी थांबवली नाहीतर आम्ही कुटुंबीय न्यायालयासमोर येऊन आत्महत्या करणार. असे ही त्यांनी बोलताना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details