बीड - औरंगाबादहुन तुळजापूरकडे देवीच्या दर्शनाला जात असताना धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या गाडीवर चोरट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. बीड तालुक्यातील चौसाळा बायपासवर पंक्चर झालेल्या कारचे टायर बदलत असताना शुक्रवारी (२६ एप्रिल) रात्री १ वाजता चोरट्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चोरट्यांनी पुरुषांसह महिलांनाही या बेदम मारहाण केली आहे. तसेच, त्यांच्याकडुन रोख रक्कम २५ हजार आणि ७ ते ८ तोळे सोनेदेखील लंपास केले आहेत. कारमध्ये एकूण ४ जण होते. त्यामध्ये २ पुरुष आणि २ महिलासह २ लहान मुलांचा समावेश होता. जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चोरट्यांचा महामार्गावर धुमाकूळ; भाविकांच्या कारवर हल्ला करून लूटमार, महिला जखमी - injured
या हल्ल्यात चोरट्यांनी पुरुषांसह महिलांनाही या बेदम मारहाण केली आहे. तसेच, त्यांच्याकडुन रोख रक्कम २५ हजार आणि ७ ते ८ तोळे सोनेदेखील लंपास केले आहेत.
बाळासाहेब त्रिंबक डोने, वैशाली बालासाहेब डोने, भागीरथी त्रिंबकराव डोने आणि वाहन चालक राजू राजपूत यांच्या सह २ लहान मुलांचा कारमध्ये समावेश होता. औरंगाबादहुन तुळजापूरकडे (क्र. एम एच २० डी. एफ.-०७३९) कारमधून हे सर्वजण प्रवास करत होते. चौसाळा बायपासवर कार पंक्चर झाल्यामुळे टायर बदलत असताना ५ ते ६ जण गाडीच्या दिशेने आले. 'पैसे द्या' म्हणून त्यांनी जोरदार मारहाण सुरू केली. यावेळी त्यांनी महिलांनाही मारहाण केली. नंतर रोख रक्कम २५ हजार आणि सोने लुटून चोरटे लंपास झाले असल्याचे बाळासाहेब डोणे यांनी सांगितले. घटनेनंतर चौसाळा पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
लुटमारीची ही घटना नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. चौसाळा बायपासवर यापूर्वीही अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही चौसाळा येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळेस बीड चौसाळा बायपासवर गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेत जखमी झालेले बालासाहेब डोने , वैशाली डोने व भागीरथी डोने यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.