बीड - हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार करणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या मित्राना आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंबाजोगाई शहराजवळील सायली लॉन्स या मंगल कार्यालयात 26 मार्च रोजी हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवासह त्याच्या मित्राने हवेत गोळीबार केल्याची घटना ( Shooting in air at Turmeric event ) घडली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या नवरदेवासह त्याच्या मित्राला अंबाजोगाई शहर पोलिसांनी रात्री ताब्यात ( Navradeva arrested in Ambajogai ) घेतले.
सापळा रचून घेतले ताब्यात - बालाजी भास्कर चाटे असे अटक केलेल्या नवरदेवाचे तर बाबा शेख असे त्याच्या मित्राचे नाव आहे. हे दोघे साकुड येथील शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना रात्री ताब्यात घेतले.
नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा - बीड जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनादरम्यान लक्षवेधी मांडून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी बिघडली आहे, हे विधान भवनात सांगितले होते. यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली होती. या सगळ्या घटना घडत असतानाच कहर म्हणजे अंबाजोगाई शहरात हळदीच्या कार्यक्रमात डिजेच्या तालावर नाचत नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी चक्क पिस्तुल बाहेर काढून हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली आणि पोलीस प्रशासनाने नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल - अंबाजोगाईतील केज रोडवर असलेल्या एका मंगल कार्यालयात बालाजी भास्कर चाटे (रा. साकूड, ता. अंबाजोगाई) या तरुणाचा हळदी समारंभ होता. हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास नवरदेव असलेल्या बालाजीनेही जमलेल्या मित्रांसोबत डिजेच्या तालावर ठेका धरला. थोड्याच वेळात आनंद ओव्हरफ्लो झालेल्या बालाजी आणि त्याच्या मित्रांनी जवळील पिस्तुलं काढली आणि हवेत गोळीबाराच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. कोणीतरी याचा व्हिडीओ केला आणि बघता बघता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला.
नवरदेवासह मित्राला घेतले ताब्यात - अंबाजोगाई शहर पोलिसांनी पो.ना. गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून बालाजी चाटे, शेख बाबा (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) आणि इतर तिघांवर अवैधरीत्या पिस्टल हातात घेऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी कलम 336 सह शस्त्रास्त्र कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत. एरवी शांत म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबाजोगाई शहरात अशा वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातवरण आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या नवरदेवाला पकडण्यासाठी शोध कार्य सुरू केले होते. मात्र त्यात पोलिसांना लवकर यश आले नाही. मात्र रात्री एका शेतात लपून बसलेले असताना नवरदेव बालाजी केंद्रे आणि त्याचा एक साथीदार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
हेही वाचा -Agitation For Water in Amravati : पाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ताचे 'शोले' टाईप आंदोलन; दर्यापूर शहरात खळबळ, पाहा व्हिडिओ