महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना जिल्हाप्रमुखाने छावणी तपासणीसाठी गेलेल्या महिला उपजिल्हाधिकार्‍यांना रोखले - venkatesh vaishnav

बीड - जिल्ह्यात छावण्यांच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्याबाजाराची तपासणीसाठी गेलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने अडवले.

पोलिस बंदोबस्तात जनावरांची मोजणी होत असतानाचे छायाचित्र

By

Published : May 9, 2019, 10:48 PM IST

बीड- जिल्ह्यात छावण्यांमधून जनावरांच्या नावाखाली कार्यकर्ते पोसण्याचा धंदा जोरात सुरु आहे. छावणीतील काळेबेरे उघड होऊन आर्थिक ‘कुंडली’ बिघडू नये म्हणून छावणी तपासणीसाठी आलेल्या महिला उपजिल्हाधिकार्‍यांच्या पथकाला तपासणीपासून तासभर रोखण्यात आले. हा प्रकार बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथे घडला. कोल्हारवाडी येथील छावणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनीच तपासणीपासून तब्बल तासभर रोखल्याचे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी म्हटले आहे. छावणी चालकाच्या या मुजोरीनंतर पोलिस बंदोबस्तात छावणीची तपासणी करण्याची वेळ प्रशासनावर आली. छावणी चालकांच्या या मुजोरीची चर्चा आता जिल्ह्यात सुरु आहे.

बीड जिल्ह्यातील छावण्यांमध्ये जनावरांचे आकडे फुगत असल्याचे समोर आल्यानंतर दुसर्‍या विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत छावण्या तपासणीचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. त्यानूसार माजलगावच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव या कोल्हारवाडी येथील छावणी तपासणीसाठी गेल्या होत्या. ही छावणी ‘मत्स्यगंधा’ सेवाभावी संस्थेमार्फत चालविली जात असली तरी प्रत्यक्षात छावणी चालविणार्‍या व्यक्तीचा राज्याच्या सत्तेतील एका पक्षाशी संबंध असल्याची माहिती आहे. छावणी तपासल्यानंतर जनावरांची खरी संख्या समोर आली तर आर्थिक ‘कुंडली’ बिघडेल हे लक्षात आल्यानंतर छावणीवर उपस्थित असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेसह इतरांनी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना तब्बल तासभर छावणी तपासण्यापासून रोखले. विशेष म्हणजे छावणीची तपासणी होऊ नये यासाठी तेथील विद्युत पुरवठा तोडण्यात आला. या संदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने पोलिस उपअधिक्षकांसह मोठा फौजफाटा छावणीवर पाठविला. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात छावणीची तपासणी करण्यात आली. शासनाच्या अनुदानावर चालणार्‍या छावणीच्या तपासणीसाठी पोलिस बंदोबस्त द्यावा लागावा इतकी छावणी चालकाची मुजोरी वाढली आहे. सत्तेच्या संरक्षणाखाली सुरु असलेली ही मुजोरी ठेचण्यासाठी आता प्रशासन काय पाऊले उचलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

रात्रीतून कमी झाली साडेसातशे जनावरे, महिनाभरानंतरही कारवाई नाही
बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथे जनावरांसाठी छावणी सुरु करण्यात आली. 3 मार्च रोजी सुरु झालेल्या या छावणीत काही दिवसातच जनावरांचा आकडा 1600 वर पोचल्याचे अहवाल सांगतात. या छावणीत 30 व 31 मार्च रोजी प्रत्येकी 1612 जनावरांची नोंद आहे. 1 एप्रिल रोजी सकाळीच म्हणजे तलाठ्यांनी अहवाल देण्याअगोदरच अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी या छावणीला भेट दिली होती. त्या दिवशीची जनावरांची संख्या थेट 871 इतकी नोंदवण्यात आली. म्हणजे एका रात्रीत तब्बल 741 जनावरे कमी झाली. विशेष म्हणजे हा आकडा छावणीत दाखवलेल्या जनावरांच्या संख्येच्या निम्म्याच्या जवळपास आहे. एका रात्रीतून इतकी जनावरे गेली कुठे आणि कशी या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला अद्याप छावणी चालकांनी दिलेले नाही. विशेष म्हणजे पुढचे काही दिवस 871 हाच आकडा कायम राहिला, तो एप्रिल अखेरच्या आठवड्यात म्हणजे 25 एप्रिल रोजी 1497 इतका झाला. 6 मे रोजी पुन्हा जनावरांच्या आकड्याने 1607 ही संख्या गाठली आहे. या प्रकरणात अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या अहवालानंतर संबंधित छावणीला नोटीस देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे, मात्र तहसीलदारांनी ती नोटीस बजावली का आणि त्याचे उत्तर काय आले, याबाबत प्रशासनाने मौन पाळले आहे. विशेष म्हणजे त्या संस्थेला तब्बल 15 छावण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. छावण्यांमध्ये नेमके काय चालले आहे याचे कोल्हारवाडीचे प्रकरण हे एक उदाहरण आहे. मात्र, या अनागोंदी कारभारावर कारवाई करण्यासाठी प्रशासन तयार नाही. कोल्हारवाडीचे प्रकरण देखील दडपण्याचा हालचाली सुरु असून काही राजकीय लोक अधिकारी कर्मचार्‍यांसमोर धमक्यांच्या 'डरकाळ्या' फोडत असल्याची माहिती आहे.

पालकमंत्री लक्ष घालणार का ?

बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज दुष्काळग्रस्त भागातील छावण्यांना भेट देणार आहेत. बीड जिल्ह्यातील राजकीय संस्कृती बदलण्याची भाषा मंत्री पंकजा मुंडे यांनी सातत्याने केली आहे. मात्र, त्यांच्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा फायदा उठवत काही कार्यकर्ते पैसे कमावण्याचा उद्योग करणार असतील तर त्या जिल्ह्याचे जे चित्र निर्माण करू पाहत आहेत त्याची ‘कुंडली’ बिघडणार आहे. आता याविषयात मंत्री पंकजा मुंडे भ्रष्टाचाराला थारा न देण्याची कठोर भूमिका घेणार का हा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यातील अनेक छावण्यांमध्ये असाच सावळा गोंधळ आहे. लहान कार्यकर्त्यांच्या छावण्यांना अनेकजण भेटी देतात. मात्र मोठ्या लोकांच्या छावण्यांकडे डोळेझाक केली जाते हाच अनुभव आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

पशुधनाच्या संख्येपेक्षा जास्त जनावरे छावणीत

बीड जिल्ह्यात चारा छावण्या सुरु झाल्यानंतर जनवरांची संख्या वाढवून लुण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. पशुगणनेनुसार बीड तालुक्यातील लहान मोठ्या जनावरांची संख्या 1 लाख 15 हजार 991 इतकी आहे. यात लहान जनावरांची संख्या 31 हजार 149 तर मोठ्या जनावरांची संख्या 84 हजार 842 आहे. मात्र, एप्रिल अखेरचा छावणीचा अहवाल पहिला तर बीड तालुक्यात छावणीतील जनावरांचा आकडा 1 लाख 27 हजार म्हणजे प्रत्यक्षातील पशुधनापेक्षा 12 हजारांपर्यंत जास्त आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात सरकारचे आणखी एक राहत शिबीर आहे, त्यातील पशुधनाची संख्या वेगळीच आहे. अनेकांची जनावरे आजही घरच्या दावणीला आहेत, ज्यांच्याकडे एक किंवा दोनच जनावरे आहेत आणि ज्यांना तेवढ्यासाठी छावणीत जाऊन राहणे परवडत नाही, अशा जनावरांची संख्या देखील वेगळी आहे. मग छावण्यांमधील आकडा इतका मोठा कसा ? याबाबत प्रशासन विचार करायला देखील तयार नाही. दुष्काळाच्या नावाखाली कार्यकर्ते पोसण्याचे काम सध्या जोरात सुरु आहे.

मोठ्या जनावरांचे आकडे फुगवले


विशेष म्हणजे छावण्यांमधील अहवाल पाहिले तर बीड तालुक्यात लहान 9 हजार 375 आणि मोठी 1 लाख 18 हजार 287 इतकी संख्या 26 एप्रिल रोजी होती. ज्या तालुक्यात मोठी जनावरे 84 हजार आहेत, त्या तालुक्यातील छावणीमधील मोठ्या जनावरांचा आकडा 34 हजारांहून अधिक असावा. यातच पैसे कमावण्याची खेळी सहज लक्षात येते. पशुगणनेनुसार लहान जनावरांची संख्या मोठ्या जनावरांच्या तुलनेत साधारणतः 25 ते 30 टक्के आहे. मात्र, छावण्यांचे आकडे पाहिले तर लहान जनावरांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षाही कमी दिसते. याचाच अर्थ अनुदान जास्त मिळवण्यासाठी मोठ्या जनावरांचा आकडा देखील फुगवला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details