बीड- युती सरकारमध्ये मित्रपक्ष अससेले शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांना मंत्री पंकजा मुंडेंनी झटका दिला आहे. शिवसंग्रामच्या तिकिटावर निवडून आलेले अशोक लोढा व विजयकांत मुंडे हे दोन जिल्हा परिषद सदस्य शनिवारी रात्री उशिरा भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
पंकजा मुंडेंचा विनायक मेटेंना धक्का; शिवसंग्रामचे दोन झेडपी सदस्य भाजपमध्ये - mundada
बीडमध्ये फो़डाफोडीच्या राजकारणाचा विनायक मेटेंना झटका... शिवसंग्रामचे २ जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये डेरेदाखल... मंत्री पंकजा मुंडेंच्या खेळीने शिवसंग्रामकडे उरला एकच झेडपी सदस्य
शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत असेल मात्र, जिल्ह्यात भाजपला सहकार्य करणार नाही' अशी भूमिका विनायक मेटे यांनी घेतली होती. त्यानंतर शिवसंग्रामचे कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर जाऊ लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. सोमवारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्य शनिवारी भाजपमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे अशोक लोढा हे शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते आहेत. विजयकांत मुंडे हे विडा जिल्हा परिषद गटातून तर अशोक लोढा चौसाळा जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. एकंदरीत शिवसंग्रामच्या चार जिल्हा परिषद सदस्यांपैकी ३ जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षाला राम-राम ठोकला आहे. यामध्ये राजेंद्र मस्के, अशोक लोढा, विजयकांत मुंडे यांचा समावेश असून आता शिवसंग्रामकडे भारत काळे हे एकमेव जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत.
मंत्री पंकजा मुंडे व आमदार विनायक मेटे यांच्यात सतत राजकीय खटके उडत आहेत. याचाच परिणाम भाजपने शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडले. याचा परिणाम जिल्हा परिषदेतील सत्तेवरदेखील होणार आहे. शिवसंग्रामचा एकच जिल्हा परिषद सदस्य शिल्लक राहिला आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेमध्ये भाजप सक्षम होत आहे.