बीड- बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसंग्रामने भाजपला मदत केली. मात्र, बीड जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात आम्हाला संपवण्याचा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम प्रस्थापितांच्या विरोधात बंड करणार आहे. शिवसंग्राम बीडमध्ये भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही. तर शेतकरी पुत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय सोनवणे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी मेटे म्हणाले, बीड जिल्ह्यात शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना सातत्याने दाबण्याचा प्रयत्न झाला. आम्ही प्रामाणिकपणे सहकार्य करत असतानादेखील पालकमंत्र्यांनी वेळोवेळी आमच्या विरोधात भूमिका घेतली. असे असतानाही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपला व पंकजा मुंडे यांना सहकार्य केलेले आहे. मदत करूनदेखील आम्हाला निधी मिळू न देण्याचे पाप पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले असल्याचा आरोप यावेळी मेटेंनी केला.