बीड - स्वतः मात्र भाजपकडून मिळालेली आमदारकी राज्यभर मिरवायची मात्र जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना भाजपलाच विरोध करायला सांगायचे. हे दुटप्पी धोरण विनायक मेटे राबवत आहेत. मी गेली अनेक वर्ष मेटे यांच्याबरोबर काम केले आहे. मला माहीत आहे, मेटे हे ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे कधीच काम करत नाहीत. हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे, असा थेट आरोप राजेंद्र मस्के यांनी शनिवारी केला आहे.
बीडजवळ पालवण येथे शनिवारी राजेंद्र मस्के मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजित बीड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता बैठक कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र मस्के बोलत होते. बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी पंकजा मुंडे यांना कडवा विरोध केला आहे.
राज्यात भाजप बरोबर असलो तरी जिल्ह्यात भाजपबरोबर राहणार नाही, अशी भूमिका आमदार मेटे यांनी घेतली आहे. मेटे यांच्या भूमिकेला टक्कर देण्यासाठी आता राजेंद्र मस्के जे अनेक वर्ष आमदार विनायक मेटे यांच्या बरोबर राहिलेले असून त्यांच्याच तालमीत वाढलेले आहेत. ते आता बीड विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.