बीड - जिल्ह्यातील परळी येथील रेल्वे स्थानकात मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने चालकाच्या जागेवर बसून रेल्वेचा ताबा घेतल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, तो रेल्वे इंजिनचा ताबा घेणारा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. रेल्वे इंजिनचा ताबा घेऊन सुरू करणार तेवढ्यात रेल्वे पोलिसांनी त्या मनोरुग्णाला धमकावून रेल्वेच्या खाली उतरवले.
मनोरुग्णाने घेतला रेल्वेचा ताबा ; इंजिन सुरू करणार तेवढ्यात.... पोलीस व तेथील स्थानिक नागरिकांनी वेळीच त्या मनोरुग्णाकडे लक्ष दिल्यामुळे मोठा धोका टळला आहे. परळीहून अकोला कडे जाणाऱ्या रेल्वे संदर्भात ही घटना घडली. पोलिसांनी नंतर त्या मनोरुग्णाला सोडून दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परळी येथे ही गाडी फलाटावर उभी असताना तो मनोरुग्ण व्यक्ती रेल्वेत ड्रायव्हरच्या ठिकाणी जाऊन बसला.
ही घटना समजल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. गाडीचा चालक येऊन त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याला यश येत नव्हते. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि त्या मनोरुग्णाला बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.
परळी रेल्वे स्टेशन वरील प्रत्यक्षदर्शी बाबा शेख यांनी सांगितले की, दुपारी सव्वा एकच्या दरम्यान परळीहून अकोल्याला जाणाऱ्या रेल्वे मध्ये अचानक एक व्यक्ती घुसला. त्याने हॉर्न वाजवत इंजिन चालू करण्याचा देखील प्रयत्न केला होता. हे पाहिल्यानंतर अचानक धावपळ सुरू झाली. तेव्हा हा व्यक्ती ड्रायव्हर नाही तर दुसराच कोणीतरी आहे, असे काही लोकांच्या लक्षात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तेथे अर्ध्या तासाने उशिरा पोलीस आले. व त्या संबंधित व्यक्तीला धमकावून त्यांनी खाली उतरवले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई होणे आवश्यक आहे, असेही बाबा शेख म्हणाले.