बीड - कोरोनाच्या संकटामुळे आठ महिन्यापूर्वी पुण्यातील मोटार इन्शुरन्स व्यवसाय मंदावला. त्यामुळे कुटुंब-कबिल्यासह पंजाब औताडे यांना आपल्या मूळ गावी म्हणजे चौसाळा येथे यावे लागले. लॉकडाउनच्या बिकट परिस्थितीनंतर रडत बसण्यापेक्षा पंजाब यांनी चौसाळा येथे पोल्ट्री फार्म सुरू केले व यशस्वीही करून दाखवले आहे. विशेष म्हणजे औताडे यांनी गावरान कोंबड्याचे पोल्ट्री फार्म (कुक्कुट पालन) सुरू केल्यामुळे त्यांच्या या व्यवसायाला गती येत आहे. लॉक डाऊनवर मात करत व्यवसाय करणाऱ्या या तरुणाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाबाबत 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा आढावा..
बीड तालुक्यातील चौसाळा येथील तरुण पंजाब औताडे यांनी चौसाळा येथे पाच महिन्यापूर्वी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. पाहता पाहता या व्यवसायाने आता चांगली गती घेतली आहे.
वडिलोपार्जित शेतीला कुक्कुटपालनाची जोड
बीड तालुक्यातील चौसाळा येथील पंजाब औताडे यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर जमीन आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी ते आपल्या कुटुंबासह पुण्यात वास्तव्य करत होते. त्यांचा पुण्यात मोटार इन्शुरन्स व्यवसाय आहे. मात्र, आठ महिन्यापूर्वी अचानक लॉकडाऊन लागले व मोटार इन्शुरन्स व्यवसाय मंदावला. म्हणून त्यांनी लॉकडाऊन दरम्यानच गाव गाठले. गावाकडे पंजाब यांचा मोठा भाऊ संतोष हेदेखील शेतीच करतात. मात्र, शेतीला कुठला जोडव्यवसाय नव्हता. परंतु पंजाब यांनी गावाकडे आल्यानंतर शांत न बसता लॉक डाऊनच्या काळात शेतातच काहीतरी करण्याचा निश्चय केला. काही अनुभवी लोकांच्या भेटी घेतल्या. यातून गावरान कोंबड्यांचे पोल्ट्री फॉर्म सुरू करण्याची भन्नाट आयडिया पंजाब औताडे यांना सुचली. मग 1 लाख 10 हजार रुपये खर्च (गुंतवणूक) करून पत्र्याचे शेड उभारले. त्यानंतर पक्षी म्हणजेच 1 हजार कोंबड्या पहिल्या टप्प्यात विकत घेतल्या. पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी चिकन विक्रीसाठीचा प्लान देखील तयार करून ठेवला होता.
हेही वाचा -कृषी पदवीधर शेतकऱ्याने केली सीताफळाची लागवड, मिळवतोय भरघोस नफा
स्वतः सुरू केले चिकन शॉप व हॉटेल व्यावसायिकांनाही घरपोच सेवा -