बीड- महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आमदार विनायक मेटे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी महाआरतीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (बुधवार) हजेरी लावली होती. गणरायाच्या आरती नंतर आ. मेटे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली. या सगळ्या घडामोडी नंतर गणपती बाप्पा आ. विनायक मेटे यांना पावणार का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. विनायक मेटे हे बीड विधानसभा मतदारसंघांमधून उमेदवारी मागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार विनायक मेटे यांना बीड विधानसभेत भाजपची उमेदवारी देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मागील वर्षभरापासून आमदार विनायक मेटे बीड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ५ हजार मतांनी फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विनायक मेटे यांचा पराभव केला होता. परंतु, २०१४ मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली ताकद आमदार विनायक मेटे यांच्या पाठिशी लावली होती. मागच्या ५ वर्षात बीड जिल्ह्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडली आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आ. मेटे व पंकजा मुंडे यांच्यात निर्माण झालेला राजकीय दुरावा व दुसरी बाब म्हणजे विनायक मेटे यांचे विश्वासू समजले जाणारे राजेंद्र मस्के हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. एवढेच नाही तर भाजपकडून बीड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखत देखील मस्के यांनी दिली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांना मेटे यांनी केलेला विरोध त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर किती परिणाम करेल हे येणारा काळच सांगेल.
हेही वाचा - शिवसंग्रामचा एकमेव शिलेदार भाजपच्या जाळ्यात, विनायक मेटेंना धक्का