बीड- महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यातील लहान मुलांचा अंगणवाडीतील खाऊ असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चक्क अंगणवाडी सेविकेने लहान मुलाचा खाऊ विकला. याबाबत बीडमध्ये अंगणवाडी सेविकेवर गुन्हा दाखल झाला आहे. पोषण आहाराच्या माध्यमातून कुपोषण मुक्त भारतासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. मात्र, बालकांना कुपोषण मुक्त करून सुदृढ भारत बनवण्या ऐवजी अंगणवाडी सेविकाच सुदृढ बनत असल्याचे समोर आले आहे. अंगणवाडीतील बालकांसाठी येणारा आहार अंगणवाडी सेविका भ्रष्ट अधिकार्यांच्या सहकार्याने लंपास करत असल्याचे उघड झाले आहे. खांडे पारगाव येथील ग्रामस्थांनी भ्रष्ट अधिकार्यांचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील खांडेपारगाव येथे अंगणवाडीतील लहान मुलांना येणारे खाद्य मुलांना न देता दुसरीकडे विकण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पिंपळनेर पोलीसांना दिली. यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी तत्काळ पोलीस कर्मचार्यांना घटनास्थळी पाठवले. यावेळी पोलीस कर्मचार्यांनी एक दुचाकी, तांदळाचे पोते, डाळ, गुळाची ढेप आदी साहीत्य जप्त केले. या प्रकरणी अंगणवाडी सेविका वैशाली लक्ष्मण ठोकळ, सुनंदा दामोदर आमटे (दोघी रा. खांडे पारगाव. ता. बीड), व माल विकत घेवून जाणारे विजय लक्ष्मण वडवरे (रा.हिरापुर ता.बीड), गौतम बबन भालेराव (रा.राजुरी ता.बीड) यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम 380 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून बालकांच्या खाऊवर ताव मारणार्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.