बीड - लोकसभा निवडणूक ही आपल्या देशातील कोणत्या उत्सवापेक्षा कमी नसते. प्रत्येक निवडणुकीची काहीतरी खासीयत असते. १९८४ ची निवडणूक बीडकरांना अजूनही लक्षात आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार केशरबाई क्षीरसागर यांना काँग्रेसचेच नेते माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा विरोध झाला होता. तरीही क्षीरसागर अनेक विरोधकांना नमवून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या.
बीड हे राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. क्रांतीसिंह नाना पाटील, कॉ. गंगाधर बुरांडे, बापुसाहेब काळदाते यांनी बीडचे नाव राज्य आणि देशपातळीवर नेले. सुंदरराव सोळंके आणि गोपिनाथ मुंडे यांच्या रुपाने बीडने राज्याचे नेतृत्वही केले. त्यांच्याच जोडीला माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांचे नावही घेतले जाते.
१९८४ ची निवडणूक केशरबाई क्षीरसागरांनी गाजवली. समोर अनेक दिग्गज उमेदवार उभे असताना आणि पक्षांतर्गत फुटीचे आव्हान असतानाही त्यांनी विजय खेचून आणला होता. ९ तगड्या उमेदवारांचा पराभव करण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. त्यावेळच्या ४ लाख ७३ हजार ११६ मतांपैकी केशरबाईंना २ लाख २१ हजार ४२१ मते मिळाली होती.