बीड - परळी विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना-रासप-रिपाईं-रयतक्रांती महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी रॅलीला संबोधित केले. परळीत विरोधकांचे आव्हान नसून विजय आपलाच आहे, असा विश्वास यावेळी मुंडे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - अखेर मुंदडा कुटुंबीय भाजपात दाखल; केजमध्ये संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले?
पंकजा मुंडे म्हणाल्या, " मी राजकारणाला 2009 ला सुरुवात केली होती. अनेकांना वाटले होते मी राजकारणात टिकणार नाही. पण जनता सदैव माझ्या पाठीशी आहे. मी निर्भीड राहून काम केले हे परळीच्या जनतेला ठाऊक आहे, म्हणून मी आतापर्यंत टिकले. परळीच्या जनतेसाठी मी संघर्ष करतेय. मी शब्दला जागते, माझ्यावर विश्वास ठेवा" धनंजय मुंडे यांनी कायम गोपीनाथ मुंडेंना त्रास दिला, असा आरोप पंकजा यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गरळ ओकलेल्या लोकांना परळीची जनता विसरणार नाही. पंकजा मुंडे हे परळीचे सुरक्षा कवच आहे ते कधीही निघू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा -माझी लढाई परळीचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी - धनंजय मुंडे
गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याअगोदर परळीतील निवासस्थानी पंकजा मुंडे यांचं औक्षण करण्यात आले. पंकजाच्या या रॅलीला खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे, माजी आमदार गोविंद केंद्रे आणि इतर नेते उपस्थित होते.