बीड - या जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी उभी आहे. मागील ५ वर्षात कोट्यावधी रुपये विकास कामासाठी खेचून आणले आहेत. १० हजार कोटीची कामे जिल्ह्यात राबवली आहेत. एवढा सगळा विकासाचा आलेख मागच्या ५ वर्षात उंचावला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या वाघिणीची शिकार गुलेर घेऊन करायची नसते, असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला. येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
बीड लोकसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने प्रीतम मुंडे यांनीसोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर भाजपच्यावतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडेसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक धांडे उपस्थित होते.
वाघिणीची शिकार गुलेर घेऊन करायची नसते-पंकजा मुंडे - beed
बीड लोकसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने प्रीतम मुंडे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपच्यावतीने घेण्यात आलेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेवर निशाना साधला.
जर स्वतःवर एवढाच विश्वास होता तर मग राष्ट्रवादीकडून तुम्ही का लोकसभेला उभे नाही राहिलात? असा प्रश्नही पंकजांनी धनंजय मुंडेंना विचारला. बीड जिल्ह्यासाठी आम्ही सतत विकासाचे स्वप्न बघतो म्हणून जनता आमच्या पाठीशी उभी आहे. ऊसतोड कामगारांचा गोपीनाथ मुंडेच्या कन्येवर विश्वास आहे इतर कुणावर नाही, असेही त्या म्हणाल्या. तसेच भाजपची आजची जाहीर सभा पाहून विरोधकांची धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांना आम्ही केलेला विकास दिसत नाही असे असले तरी बीड जिल्ह्याचा विकास कोण करतंय हे जनतेला माहित आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे उमेदवार प्रीमत मुंडेंच्याच पाठीशी उभे राहा असे आवाहनही त्यांनी केले.