महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 19, 2021, 10:47 AM IST

Updated : Jan 19, 2021, 1:39 PM IST

ETV Bharat / state

ना गुलाल...ना मिरवणूक, स्वच्छता मोहीम राबवत साजरा केला विजयाचा आनंद!

ग्राम पंचायत निवडणूक निकाल लागल्यानंतर अनेक ठिकाणी गुलालाची उधळण करत विजयी गटाने जल्लोष केल्याचे चित्र पहायला मिळाले. मात्र, या सगळ्या डामडोलाला पैठण येथील युवकांच्या पॅनलने फाटा दिला आहे. त्यांनी विजयानंतर हाती खराटे घेऊन गावात स्वच्छता अभियान राबवत ग्रामस्वच्छतेचा संदेश दिला.

Cleanliness Drive
स्वच्छता मोहीम

बीड -गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर नवोदित ग्रामपंचायत सदस्यांनी ना गुलाल उधळला, ना मिरवणूक काढली. हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव झाडून काढत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या विजयाचा आनंद साजरा केला. बीडच्या केज तालुक्यामधील पैठण गावातील सदस्यांनी ही प्रेरणादायी मोहीम राबवली आहे.

बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी हाती आले. गावागावांमध्ये मिरवणुका काढत, गुलाल उधळून नवनिर्वाचित सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र, केज तालुक्यामधील पैठण येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निवडून आल्यानंतर गावात मिरवणूक काढण्यापेक्षा हातात झाडू घेऊन पैठणगाव स्वच्छ केले. निवडून आल्यानंतर थाटामाटात मिरवणूक काढण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. त्यांच्या या कृतीची जिल्हाभरात चर्चा होत आहे.

अशी आहे गावची पार्श्वभूमी -

२०११च्या जनगणनेनुसार २ हजार ४०० लाेकसंख्या व ४३६ उंबरठे असलेले पैठण हे गाव आहे. यापूर्वी निवडणूक म्हटले की, गावात भांडणतंटे व्हायचे. प्रचाराची रॅली जरी काढायची असली तरी वादविवादाचे चित्र दिसून यायचे. प्रत्येक निवडणुकीसाठी गावातील मातब्बरांचे दोन पॅनल समोरासमोर ठाकलेले असायचे. यंदा मात्र सुशिक्षित तरुणांनी ग्रामविकासाचे स्वप्न समोर ठेवून मतदारांना तिसऱ्या आघाडीच्या रूपाने नवा पर्याय दिला. प्रचार करताना युवकांनी शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी गाव परिसरात नदी खोलीकरण, रूंदीकरण, जलयोजनेची व्यवस्था, पाझर तलावाची दुरुस्ती, गावात दर्जेदार शैक्षणिक सुविधा देणे व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे व सर्वात महत्वाचे म्हणजे गाव व्यसनमुक्त करणे, हा अजेंडा घरोघरी पोहोचवत प्रचार केला. गावात १५ जानेवारीला १ हजार ४७५ इतके मतदान झाले होते. ग्रामस्थांना नेहमीच्या चेहऱ्यांपेक्षा युवकांनी दिलेल्या पॅनलचे नवीन चेहरे भावले. शिवाय तरुणांची तळमळ व ग्रामविकासाचा अजेंडा मतदारांना आवडला. सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर या तिसरी आघाडी पॅनलला मतदारांनी नऊ पैकी सात जागांवर विजय मिळवून देत ग्रामविकासाची संधी दिली आहे. एवढी जबाबदारी ग्रामस्थांनी दिलेली असल्याने त्यांनीही विजयानंतर गुलालाची न उधळण न करता गावात स्वच्छता अभियान राबवले. हाती झाडू, खराटे, टोपले घेत कचरा साफ करण्यात आला. नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. या अनोख्या जल्लोषाने ग्रामस्थांना परिवर्तनाची चाहुल लागली आहे. शिवाय इतर गावांसमोर देखील नवा आदर्श मांडण्यात आला.

'हे' आहेत गावचे कारभारी -

जयश्री रावसाहेब चौधरी, जनाबाई विजयकुमार चौधरी, किशोर लक्ष्मण सरवदे, बाबासाहेब गंगाधर सरवदे, विजया विष्णू दिक्षित, हनुमंत भारत चौधरी, सुजाता नवनाथ चौधरी यांनी या निवडणुकीत बाजी मारली. यासह पॅनलच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी केवळ विजेत्या उमेदवारांचा सत्कार केला व त्यानंतर स्वच्छता राबवले. दोन तास गावात स्वच्छता करण्यात आली. वॉटर कप स्पर्धेत आम्ही सर्वांनी योगदान दिले होते. विकासाची आम्हा सुशिक्षित तरूणांची तळमळ सर्व ग्रामस्थांना समजली. यातूनच त्यांनी ग्रामपरिवर्तनासाठी आम्हाला संधी दिली. निवडून आलेल्या सदस्यांत बहुतांशी तरूण तर काहीजण कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आहेत. लोकसहभाग चळवळ या नावाने आता आम्ही गावाचा कायापालट करणार आहोत, असे पॅनल सदस्य रुस्तुम चौधरी म्हणाले.

Last Updated : Jan 19, 2021, 1:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details