बीड- एके काळी बीड जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. पण, त्याच बीड जिल्ह्यात मात्र काँग्रेसला अवकळा आली असल्याचे वास्तव समोर येत आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसने मुलाखती घेतल्या या सहा विधानसभा मतदारसंघासाठी सरासरी प्रत्येकी एका मतदारसंघात केवळ दोघांनी म्हणजेच केवळ 12 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. दुसरीकडे मात्र शिवसेना व भाजप या पक्ष्याच्या उमेदवारी मागण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत.
2 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी काँग्रेसने बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा जागांसाठी मुलाखती घेतल्या. यामध्ये एकूण 12 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. बीड जिल्ह्यात आष्टी, बीड व परळी या तीन विधानसभेच्या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली तर बीड जिल्ह्यातील आष्टी, बीड, परळी या तीन विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा उमेदवार द्यावा, अशी मागणी विधानसभा निरीक्षकांकडे कार्यकर्त्यांनी केली. मंगळवारी विधानसभा निरीक्षक प्रकाश मुकदिया, काँग्रेसचे प्रभारी सत्संग मुंडे, बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी जिल्हाध्यक्ष सर्जेराव काळे यांनी बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षात राहून विरोधी गटाला कोणी कोणी मदत केली, याबाबतच्या लेखी तक्रारी देखील प्रकाश मुकदिया यांच्याकडे बीड जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. 6 ऑगस्ट रोजी मुंबई येथे काँग्रेसच्या बैठकीत फितुरांच्या संदर्भात देखील निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत यावेळी प्रकाश मुकदिया यांनी दिले.