बीड- भूमिहीन कुटुंबासमोर दुष्काळात जगायचं कसं? असा प्रश्न आहे. ज्या बागायतदारांडे काम मिळायचे त्याच बागायतदारांवर भीषण दुष्काळामुळे रोजगार हमीच्या कामावर जाण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत केजमध्ये महिला उद्योग मंडळाच्या विजया कांबळे यांनी पुढाकार घेऊन शिलाई उद्योगातून महिलांना दुष्काळात आर्थिक पाठबळ दिले आहे.
मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळाचा सामना शेतमजूर करत आहे. जिल्ह्यातून दीड लाखांवर कामगार मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी स्थलांतरित झालेला आहे. यामुळे केज येथे नवचेतना सर्वांगीण विकास केंद्रांतर्गत महिला उद्योग मंडळ उभारून विजया कांबळे यांनी भीषण दुष्काळात अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. पंधरा बाय पंधराच्या खोलीत १० ते ११ शिलाई मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तेथे महिलांसाठीचे कपडे शिवण्याचे काम चालते.
असा सुरू केला शिलाई उद्योग-
बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ पडतो. हा दुष्काळ बीड जिल्ह्यासाठी नवा नाही. अशा बिकट परिस्थितीत भूमिहीन आणि शेतजमीन नसलेल्या मजुरांनी जगायचं कसे? हा प्रश्न नवचेतना सर्वांनी विकास केंद्र या संस्थेच्या महिला सदस्यांसमोर निर्माण झाला. अशा परिस्थितीत सर्व महिलांशी चर्चा झाली. शिलाई उद्योग आपण करू शकतो. याबाबत सगळ्यांचे एकमत झाले. ग्रामीण भागातील महिला जास्त शिकलेल्या नसल्याने इतर कुठला उद्योग सुरू करण्यापेक्षा शिलाई मशीनचा उद्योग फायदेशीर राहू शकतो. असे एक मत झाले. मात्र, शिलाई मशीन आणायच्या कोठून असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सचिव मनीषा घुले यांनी केजमधील शिलाई मशीन दुकानदारांना उधारीवर शिलाई मशीन मागितल्या. संस्थेचे नाव पाहून आणि एवढ्या सगळ्या महिला एकत्र काम करणार आहेत. यामुळे दुकानदाराने पाहिजे तेवढ्या शिलाई मशीन देण्याची तयारी दर्शवली. मग काय पंधरा बाय पंधराच्या खोलीतून पंचवीस ते तीस महिलांनी एकत्र येऊन शिलाई उद्योग सुरू केला. आता याद्वारे महिलांनी बनवलेल्या वस्तू केज बरोबर जिल्ह्यातही विकल्या जाऊ लागल्या आहेत, असे विजया कांबळे यांनी सांगितले. भीषण दुष्काळात केज शहरातील व परिसरातील अनेक महिलांना उद्योग मिळाला. दिवसाकाठी अडीचशे ते तीनशे रुपये मजुरी महिलांना मिळू लागली आहे. दुष्काळात भूमिहीन असलेला मजूर महिलांना हाताला काम मिळालं असल्याने महिला आनंदी आहेत.