बीड - केज विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांचे तिकीट भाजपने कापले आहे. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या नमिता मुंदडा यांना आता भाजप केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देत असल्याचे संकेत मिळत आहेत. या सगळ्या घडामोडी नंतर भाजपच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. सोमवारी अक्षय मुंदडा, नंदकिशोर मुंदडा व नमिता मुंदडा यांनी गोपीनाथ गड येथे जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले व थेट भाजपमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत नमिता मुंदडा यांनी थेट भाजपचा रस्ता धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांची उमेदवारी जाहीर केली होती. विशेषतः शरद पवार यांनी बीडमधील कार्यकर्ता मेळाव्यात नमिता मुंदडा यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत नमिता मुंदडा यांनी थेट भाजपचा रस्ता धरला. एवढेच नाही तर नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
अक्षय मुंदडा, नंदकिशोर मुंदडा व नमिता मुंदडा यांनी गोपीनाथ गड येथे जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले हेही वाचा - बीडमध्ये संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या आखाड्यात, राहुल वाईकरांचे नाव चर्चेत
भाजपकडून नमिता मुंदडा यांना केज विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येणार आहे. या अनुषंगानेच सोमवारी सकाळी मुंदडा कुटुंबीयांनी परळी येथे जाऊन बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. अद्यापपर्यंत विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांचे तिकीट कापले असल्याची अथवा मुंदडा यांना उमेदवारी दिली असल्याची रीतसर घोषणा भाजपने केली नसली तरी घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे संगीता ठोंबरे यांचे तिकिट कापल्याचे संकेत मिळत आहे.
हेही वाचा - बीडच्या राजकारणात महिलांचा दबदबा; प्रश्न मात्र आजही कायम
संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीला झाला विरोध-
केजच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांच्या विरोधात केज विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रोष आहे. अशी रिपोर्टिंग भाजप पक्षाकडे झाली. याशिवाय केज विधानसभा मतदार संघातील इतर भाजपमधील गट संगीता ठोंबरे यांच्या विरोधात होते. परिणामी पक्षाने संगीता ठोंबरे यांचे तिकिट कापून नमिता मुंदडा यांना दिले आहे. या सगळ्या घडामोडीनंतर संगीता ठोंबरे पक्षात राहून पक्षाचे काम करणार की, बंडखोरी करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.