महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गूढ आवाजाने परिसर हादरला; केज तालुक्यातील केकानवाडी येथील प्रकार - बीड भूकंप बातमी

केज तालुक्यातील केकानवाडी परिसरात अचानक झालेल्या गुढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते. मात्र, ते भूकंप नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिक
नागरिक

By

Published : Oct 14, 2020, 10:42 AM IST

बीड - केज तालुक्यातील केकानवाडी परिसरात अचानक झालेल्या गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते. जोरदार आवाजामुळे भुकंपाच्या शक्यतेने घाबरलेले ग्रामस्थ लगबगीने घराबाहेर पडले. मात्र, हे आवाज कशाचे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मंगळवारी सायंकाळी 7 वाजतानंतर केकानवाडीत हे आवाज येण्यास सुरूवात झाली. पहिल्याच आवाजात जमीन हादरली आणि घराची दारे, खिडक्या आणि पत्रे वाजण्यास सुरूवात झाली. भूकंप असावा या शक्यतेने भयभीत ग्रामस्थांनी मुलाबाळांसह घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा आवाजाची पुनरावृत्ती झाली. पंधरा दिवसांपासून अधूनमधून असे आवाज येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी कर्मचाऱ्यांसह केकानवाडीस भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून आवाज येणे सुरूच होते. महसूलचे कर्मचारी मंगळवारी रात्री केकानवाडीत मुक्कामाला थांबणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

भूकंपाची नोंद नाही

नायब तहसीलदार देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट केल्यानंतर बीड आपत्ती व्यवस्थापनाने लातूर येथील भूकंप विभागाशी संपर्क साधला. त्यांच्याकडील भुकंपमापन यंत्रावर कसल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सतर्क राहावे आणि सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भूवैज्ञानिक भेट देणार

बुधवारी बीड येथील भुवैज्ञानिक केकानवाडीस भेट देऊन तपासणी करणार आहेत. त्यानंतरच हे आवाज कशामुळे होत आहेत हे स्पष्ट होवू शकणार असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा -बीड जिल्हाधिकार्‍यांच्या ई-मेलचा गैरवापर; अज्ञाताविरुद्ध पाटोदा ठाण्यात गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details