परळी वैजनाथ- उचल घेऊन मजुर न पुरविल्याच्या कारणावरून एका वीटभट्टी लेबर कॉन्ट्रॅक्टरचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परळी तालुक्यातील दाऊतपूर येथील दोघांना अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गर्शनाखाली पोलिसांनी (शनिवार) 27 फेब्रुवारीला अटक केली आहे.
अपघात झाल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न-
धाराजी बनसोडे (वय 40) रा. पूर्णा तालुका जि. परभणी, असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 22 फेब्रुवारी रोजी परळी-गंगाखेड रोडवर त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली होती. या प्रकरणी संशय आल्यावरून कसून तपास सुरू केला. तपासात हायवा खाली चिरडून मृत्यू झाला. व अपघात झाल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे धाराजी बनसोडे यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.