बीड- कोरोना विषाणूचा फैलाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. मात्र, तरी देखील जिल्ह्यात इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लोंढे येत आहेत. हा प्रकार जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख राहुल रेखावार यांनी लक्ष घालून जर थांबवला नाही, तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
रविवारी दुपारनंतर बीडमध्ये काही मजूर दाखल झाले असून त्यांना निवारागृहात ठेवण्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या चेकपोस्टवरुन लोक येत असल्याचे चित्र आहे. विशेषत: मजुरांची संख्या यात मोठी आहे. जिल्ह्याच्या सीमा सील केलेल्या असतानादेखील नागरिकांचे लोंढेच्या लोंढे परजिल्ह्यांतून या जिल्ह्यात येतातच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.