बीड- पोकलेन घेण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा गळा आवळून खून केला, असा आरोप विवाहितेच्या आई-वडिलांनी केला आहे. सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मुलीच्या माहेरच्यांनी घेतली आहे. बीड जिल्हा रुग्णालय परिसरात मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती, तर आईने मुलीचा मृतदेह पाहून जिल्हा रुग्णालयातच आक्रोश केला.
पोकलेनसाठी माहेरहून पैसे न आणल्याने विवाहितेचा खून? 'आधी दाबला गळा, मग दोरीला लटकवला मृतदेह' - खून
अमृताला आधी गळा दाबून मारले. त्यानंतर घरात एका दोरीच्या साहाय्याने लटकवले होते. तिला प्रचंड त्रास होता. तिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे, अशी तक्रार अमृताच्या वडिलांनी बीड जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीला केली आहे.
अमृता शरद तांबे, असे मृत महिलेचे नाव आहे. २३ जून २०१८ रोजी शिरूर कासार तालुक्यातील पौडुळ येथील आसाराम कोंडीबा चव्हाण यांची मुलगी अमृताचा विवाह त्याच तालुक्यातील राक्षसभूवन येथील शरद रघुनाथ तांबे या मुलाशी झाला होता. ३ लाख रुपये हुंडा देऊन हे लग्न झाले होते. याशिवाय लग्नात १२ लाख रुपयांचा खर्च केला होता. शेतकरी बापाने मुलीच्या लग्नासाठी पंधरा लाखांवर खर्च केला. मात्र, सासरच्या मंडळींची खदखद कायमच होती. लग्नानंतर सहाच महिन्यांनी पोकलेन घेण्यासाठी सासरची मंडळी अमृताला त्रास द्यायला लागली. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे त्या विवाहित मुलीचे वडील सासरच्या मंडळींना पोकलेन घेण्यासाठी ५ लाख रुपये देणार कुठून? असा प्रश्न निर्माण झाला.
लग्न झाल्यानंतर वर्षभरात २ वेळा अमृताला हुंड्याची मागणी करत माहेरी आणून सोडले होते. मात्र, मध्यस्थी माणसांनी सासरच्या मंडळींची समजूत काढून तिला परत नांदायला पाठवली होती. आता पुन्हा २ दिवसांपूर्वी मुलीला पैशासाठी छळू लागले. पोकलेन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत तिचा छळ सुरू केला. छळ असह्य होत असल्याने २ दिवसांपूर्वीच अमृताने आपल्या माहेरी पैशासाठी निरोप पाठवला होता. यावर विवाहितेचे वडील काही मध्यस्थ लोकांना घेऊन हा विषय मिटवणार होते. मात्र, त्यापूर्वीच मंगळवारी सकाळी तिचा खून झाला. असल्याची माहिती वडील आसाराम कोंडीबा चव्हाण यांना मिळाली.
अमृताला आधी गळा दाबून मारले. त्यानंतर घरात एका दोरीच्या साहाय्याने लटकवले होते. तिला प्रचंड त्रास होता. तिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे, अशी तक्रार अमृताच्या वडिलांनी बीड जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीला केली आहे. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तिच्या आईवडिलांनी घेतली आहे. मुलीचा नवरा शरद रघुनाथ तांबे, सासू अनिता रघुनाथ तांबे आणि सासरा रघुनाथ तांबे या तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया जिल्हा रुग्णालय येथील पोलीस चौकीत सुरू आहे.