महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अन्...'त्यांनी' पोलीस अधीक्षक कार्यलयातच उरकला विवाह

बीडमध्ये बुधवारी एका जोडप्याने चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातच एक दुसऱ्याला पुष्पहार घालत लग्न केले. आयुष्यातील लग्नासारखा सोहळा 'कोरोना वॉरियर्स' असलेल्या पोलिसांच्या साक्षीने उरकून हा क्षण अविस्मरणीय केल्याचे या जोडप्याने सांगितले आहे.

Beed
Beed

By

Published : May 14, 2020, 11:01 AM IST

बीड- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण देश ठप्प झाल्यासारखा आहे. याचा फटका विविध घटकांना बसला आहे. तर यामधून विवाह सोहळे देखील सुटलेले नाहीत. बीडमध्ये असाच एका विवाह सोहळा चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला आहे. प्रताप दातार व प्रतीक्षा कोल्हे असे या जोडप्याचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक कार्यलयात विवाह

कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलिसांचे योगदान आहे. संचारबंदी, लॉकडाऊन, जमावबंदी आदी आदेशांचे तंतोतंत पालन व्हावे, यासाठी पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत. यामुळे बीड अद्याप कोरोनामुक्त आहे. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी लग्नसोहळेही रद्द झाले. मात्र, घरगुती सोहळ्यांना प्रशासनाने 10 पेक्षा अधिक लोकांची गर्दी न करण्याच्या अटीवर मान्यता दिलेली आहे. शिवाय नोंदणी पध्दतीनेही विवाह लावले जात आहेत. मात्र, प्रताप दातार व प्रतीक्षा कोल्हे या जोडप्याने कोरोना वॉरियर्स असलेल्या पोलिसांच्या साक्षीने लग्नसोहळा करण्याची इच्छा व्यक्त केली. पोलीस अधीक्षकांनीही त्यांना संमती दिली अन् अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या दालनात या जोडप्याचा विवाह पार पडला.

कोरोनासारख्या संकटात लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्याने अखेरपर्यंत एकमेकांना साथ देण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रताप दातार हा केज तालुक्यातील असून प्रतीक्षा कोल्हे औरंगाबादची आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत. दरम्यान, लग्नसोहळ्याचा वाचलेल्या खर्चातील काही रक्कम हे जोडपे पोलीस कल्याण निधीसाठी देणार आहे. कोरोना वॉरियर्ससमोर रेशीमबंध जुळविणाऱ्या या जोडप्याच्या लग्नाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे.

यावेळी 'फिजिकल डिस्टन्सिंग'चा नियम पाळण्यात आला. अवघ्या 10 मिनिटात हा सोहळा उरकला. वधूची आई, वराचा भाऊ आणि सामाजिक कार्यकर्ते के. के. वडमारे अशी मोजकीच मंडळी वऱ्हाडी म्हणून उपस्थित होती. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नवदाम्पत्यास पेढा भरवला व पुस्तक भेट देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details