बीड MLA Laxman Pawar Resign : राज्यात सध्या मराठा आरक्षण आंदोलन (Maratha Protest) पेटलंय. मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिलाय. रविवारी सकाळी मराठा आंदोलकांनी माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी व बंगला जाळत निषेध व्यक्त केला. त्यामुळं बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा : गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
लक्ष्मण पवार यांचा राजीनामा : मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आमदार लक्ष्मण पवार यांनीही राजीनामा दिला आहे.