बीड Manoj Jarange On OBC : मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता अंतरवाली सराटी येथे 17 दिवस आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल बीड जिल्ह्यामध्ये सभा झाली. यावेळी मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी ओबीसी आणि मराठा समाजासंदर्भात भाष्य केलंय.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील :यावेळी बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय आता आपण थांबणार नाही. सरकारने दिलेल्या वेळेत कुणबी जात प्रमाणपत्राचा सरसकट जीआर काढावा, असं जरांगे म्हणाले. तसंच जर ओबीसी मध्ये यायचं असेल तर एखाद्या जातीला किंवा समूहाला मागास सिद्ध करावं लागतं, असंही ते यावेळी म्हणालेत.
राज्य सरकारवर साधला निशाना :पुढे सरकारवर टीका करत जरांगे पाटील म्हणाले की,आपल्यामध्ये दुसरा गट तयार करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल. पण अशा कुठल्याही गोष्टीला आपण बळी न पडता आता आरक्षण मिळेपर्यंत एकत्र लढायचं. आपल्या प्रतिष्ठेसाठी राजकीय नेते एका रात्रीत पक्ष बदलून सरकार स्थापन करतात. त्यामुळे आता आपण आपल्या मुलाबाळांच्या प्रतिष्ठेसाठी एकत्र यायचंय. तसंच सरकारच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता आरक्षण मिळेपर्यंत हा लढा एकत्र लढायचा, असंही जरांगे म्हणाले.
कोण आहेत जरांगे पाटील :मराठा आरक्षणामुळे चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील मातोरी गावचे. मात्र नंतर ते जालन्यातल्या अंबड तालुक्यातील अंकुश नगर इथं आले. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या जरांगे पाटलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढलेत. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या जरांगे पाटलांनी मिळेल ते काम करत आपल्या संसाराचा गाडा हाकला. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असा त्यांचा परिवार आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी त्यांच्या चार एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन विकल्याने ते अजूनच चर्चेत आले.
हेही वाचा :
- Maratha Reservation Protest : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज पुण्यात उपोषण; औंध, बाणेर, बालेवाडी राहणार बंद
- Maratha Reservation: रात्री उशिरा जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद...एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांना काय सांगितलं?
- Maratha Reservation: सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; सरकारला थोडा वेळ द्यावा... अर्जुन खोतकर यांची विनंती