बीड - कोरोना विषाणू संदर्भात खबरदारी म्हणून 21 व 22 मार्चला बीड शहरासह संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते. जिल्हाधिकारी रेखावार यांच्या आवाहनाला बीडकरांनी प्रतिसाद दिला असून शनिवारी संपूर्ण बीड शहर लॉकडाऊन झाल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे शनिवारपर्यंत बीड जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. ही बाब बीड जिल्ह्यासाठी समाधानकारक आहे.
हेही वाचा...'कोरोनाचं संकट टळेपर्यंत ३ महिन्यांसाठी सीएए, एनपीआर रद्द करा'
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग कमालीचे सतर्क झाले आहे. बीड जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र काळजी म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले होते. विशेष म्हणजे बीड जिल्हा 21 व 22 मार्च रोजी बंद ठेवण्याचे आवाहन रेखावार यांनी केले. त्यांच्या या आव्हानाला बीड जिल्ह्यातील नागरिक व व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शनिवारी बीड शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने कडेकोट बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा...कोरोना विशेष: भारत तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर.. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती
31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. जिल्हा आरोग्य विभाग देखील कोरोना विषाणूचा संदर्भाने सतर्क आहे. जिल्ह्यात 14 ठिकाणी चेक पोस्ट बनवण्यात आले आहेत. पर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी बीड जिल्ह्याच्या सीमेवरच केली जात असल्याचेही पाहायला मिळत आहे.