बीड -दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीडमध्ये बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करत शेतकरी विरोधातील काळे कायदे रद्द करा, अशी मागणी केली आहे. यावेळी उपस्थित आंदोलकांनी दिलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
'किसान बाग आंदोलन'
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जे तीन काळे कायदे तयार केलेले आहेत. त्या कायद्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आम्ही बीडमध्ये वंचित बहुजन आघाडी व मुस्लीम समाजबांधव यांच्यावतीने किसान बाग आंदोलन करत आहोत. या आंदोलनाची सरकारने तत्काळ दखल घेऊन शेतकरी विरोधातील ते तीन काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली होती.
'आंदोलन अजून तीव्र करू'
केंद्र सरकारकडून वारंवार शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. जर सरकारने ते काळे कायदे मागे घेतले नाही तर किसान बाग आंदोलन अजून तीव्र करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, प्रा. विष्णू जाधव, डॉ. नितीन सोनवणे, ॲड. शेख शफिक, प्रा. शिवराज बांगर, बबन वडमारे यांनी दिला आहे.