बीड- पालकमंत्री पंकजा मुंडे नदी खोलीकरण व रुंदीकरण तसेच जलसंधारण मोहीम जलदगतीने राबवत आहेत. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे आणि भाजपच्या ताब्यात असलेली शिरूर कासार येथील नगरपंचायत चक्क नदीपात्रातच प्रवाह अडवून बाजार ओटे बांधून प्रवाह रोखत आहेत.
सिंधफणा नदीत बाजार ओटे बांधण्याची परवानगी दस्तुरखुद्द तत्कालीन बीड जिल्हाधिकारी यांनीच दिली असल्याचा खुलासा शिरूर कासार नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे. सिंधफणा नदी पात्रातील बाजाराचे ७१ लाख रुपयांचे अनाधिकृत काम थांबवून सिंधफणा नदी वाचवावी, अशी मागणी गटनेते तथा नगरसेवक शेख नसीर शेखलाला यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण-
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या तालुक्याच्या शहराच्या बाजूने सिंधफणा नदी गेलेली आहे. या नदीचा प्रवाह मोठा असतो. यापूर्वी सिंधफणा नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीचा तडाखा बसलेला आहे. असे असूनही या नदीपात्रातच बाजार ओटे बांधण्याची परवानगी तत्कालीन बीड जिल्हाधिकारी यांनी दिल्याचा खुलासा शिरूर कासार येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणात आम्ही अधिक खोलात गेलो असता असे लक्षात आले की, सिंधफणा नदीच्या प्रवाह मार्गावर बाजार ओटे बांधण्याबाबतचा ठराव गतवर्षी शिरूर कासार नगर पंचायतीतील सदस्यांनी घेतला होता. आज जे सदस्य बाजार ओटे बांधण्यासाठी विरोध करत आहे. ते देखील ठराव घेताना एकाच गटात होते. मात्र, आता शिरूर कासार येथील राजकीय समीकरणे बदलली असल्याने अनधिकृत जागेवर बाजार ओटे बांधले जात असल्याचा भांडाफोड झाला. विशेष म्हणजे या प्रकरणात तत्कालीन बीड जिल्हाधिकारी यांची बाजार ओटे बांधण्यासाठी परवानगी असल्याचा खुलासा नीलिमा कांबळे यांनी केला. मी मार्चनंतर शिरूर नगरपंचायतीचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सिंधफणा नदीच्या प्रवाहात बाजार ओटे बांधण्याच्या कामाला कशी परवानगी मिळाली, हे मी सांगू शकत नाही. असेही कांबळे म्हणाल्या.