बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ येथे दारूड्या पतीने विटाने ठेचून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एम.डी. विटभट्टीवर काम करणार्या तरुणाने दारुच्या नशेत पत्नीचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोक नरसिंगे ( वय- 27) यास अटक केली असून दिपाली अशोक नरसिंगे, असे मृत महिलेचे नाव आहे.
पतीने विटांनी ठेचून केला पत्नीचा खून नरसिंगे हे दाम्पत्य कळंब तालुक्यातील रायगव्हण येथील मूळ रहिवासी आहेत. या दाम्पत्याला 4 महिन्यांची मुलगी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील रायगव्हण येथील अशोक नरसिंगे हा गेल्या काही महिन्यापासून पत्नी दीपालीसोबत अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ येथील एम.डी.विटभट्टीवर मजुरीचे काम करत होता. अशोकला दारुचे व्यसन होते. त्यामुळे सातत्याने पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे.
मंगळवारी आठवडी बाजारानिमित्त अशोक हा अंबाजोगाई शहरात आला होता. बाजार करून अशोक नरसिंगे याने गावाकडे जात असताना दारू सेवन केली. नशेत असलेला अशोक जेव्हा विटभट्टीवर आला तेव्हा दीपाली आणि अशोकचा शाब्दिक वाद सुरू झाला. या वादातून अशोकने दारूच्या नशेत दीपालीच्या डोक्यामध्ये विटांचा मारा केला. या मारहाणीत दीपालीचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटना ही रात्री उशीरा घडली. घटनेची माहिती स्थानिक लोकांनी अंबाजोगाई पोलिसांना दिली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे राऊत घटनास्थळी झाले. त्यांनी तेथील पंचनामा करत आरोपीला अटक केली. वर्षाभरापूर्वीच नरसिंगे दाम्पत्याचा विवाह झाला होता.