बीड- घर बांधण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये न आणणार्या पत्नीचा गळा दाबून खून करणार्या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस.महाजन यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पतीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याने शिक्षा ठोठावण्यात आली. २०१७ साली आरोपीने पत्नीचा पैशाच्या मागणीवरून खून केला होता.
पैशासाठी पत्नीचा खून करणार्या पतीस जन्मठेप; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
घर बांधण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये न आणणार्या पत्नीचा गळा दाबून खून करणार्या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस.महाजन यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
गळा दाबून केला होता खून -
अस्लम याकूब शेख (रा.गुळज ता.गेवराई) असे त्या आरोपीचे नाव आहे. सन 2010 मध्ये मयत समिना हिचा अस्लमसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर समिना हीस तिच्या पतीने दोन वर्ष चांगले नांदवले. त्यानंतर मात्र घर बांधणीसाठी माहेरहुन दोन लाख रुपये आणण्याच्या कारणावरुन तिचा शारिरिक व मानसिक छळ केला. 17 ऑक्टोबर 2017 रोजी पहाटे समिनाचा गळा दाबून त्याने खून गेला. या प्रकरणी मयत समिनाचे वडील शेख रशीद शेख अब्दुल यांच्या फिर्यादीवरुन अस्लम याकूब शेख व इतर चौघांवर चकलांबा ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एन.एम.शेख व उपनिरीक्षक व्ही.के.जोगदंड यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण बीड सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.
दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास -
या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस.महाजन यांच्या समोर झाली. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांचे अवलोकन करुन व सहाय्यक सरकारी वकील बी.एस.राख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी अस्लम याकूब शेख यास दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा व 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील बी.एस.राख यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सी.एस.इंगळे व पोलीस कर्मचारी के.व्ही.पालवे यांनी मदत केली.
दहा साक्षीदार तपासले
विवाहितेच्या खून प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. ही यादी व त्यांचे नातेवाईक साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच इतर साक्षीदारांचे जवाब महत्वाचे ठरले.