बीड -पैठण येथील जायकवाडी प्रकल्प 90% भरला असल्याने प्रकल्पातून बीडच्या माजलगाव प्रकल्पात पाच हजार क्युसेस वेगाने पाणी सोडले जात आहे. या पाण्याचा बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या 63 गावांना फटका बसू शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात गोदाकाठी एकूण 63 गावे आहेत. यामध्ये गेवराई तालुक्यात 32 गावे, माजलगाव तालुक्यात 26 गावे तर परळी तालुक्यात पाच गावे आहेत. जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी अद्याप बीड जिल्ह्यात पोहोचले नाही. बीड जिल्ह्यात पाणी येण्यापूर्वी खिरपुरी, शहागड, पाथरवाला बंधारा भरून पुढे पाणी माजलगाव धरणात जाणार आहे. मात्र, 2005 मध्ये अचानक गोदाकाठी वसलेल्या गावांना जायकवाडीच्या पाण्याने वेढा टाकला होता. यामुळे अनेक गावे पाण्याखाली जाऊन संपर्क तुटला होता. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.