बीड - पूजा चव्हाण प्रकरणांमध्ये विरोधी पक्षाकडून भूमिका मांडत असलेले अतुल भातखळकर यांच्याविरोधात बंजारा समाजाच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी तसेच अश्लील व जातिवाचक शब्दाचा वापर करत माध्यमांवर बदनामीकारक माहिती दिल्यामुळे भाजप नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने परळी या ठिकाणी करण्यात आली. परळी पोलीस स्टेशनमध्ये बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अतुल भातखळकर यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात, 'आपलेच दात आणि आपलेच ओठ' - माजी आमदार
दरम्यान, या आत्महत्या प्रकरणासंदर्भात नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशी संजय राठोड थेट संबंध असल्याचा उल्लेख भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.
बंजारा समाजाचे नेते आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले, याबाबत काय बोलायचं आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू आहे आणि या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल आहे. त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणार नाही. माझा संजय राठोड यांच्याशी संपर्क झालेला नाही. जर माझा संपर्क झाला तर मी त्यांना या प्रकरणासंदर्भात विचारणा करेले, अशी माहिती त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितले.
हेही वाचा-आरे जंगलात आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल